नागपुरात दोन लाखांची लाच स्वीकारताना अभियंता जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:01 AM2020-06-26T00:01:41+5:302020-06-26T00:03:39+5:30
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंता विजय विष्णूजी टाकळीकर आणि त्यांचा वाहनचालक जयेंद्र विठोबाजी रेवतकर या दोघांना दोन लाखांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने आज अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंता विजय विष्णूजी टाकळीकर आणि त्यांचा वाहनचालक जयेंद्र विठोबाजी रेवतकर या दोघांना दोन लाखांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने आज अटक केली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कंत्राटदार हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. ते काटोलमध्ये राहतात. त्यांनी करारानुसार केलेल्या कामातील बिल मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांनी सहा लाख रुपयांची लाच मागितली होती. १४ मार्चला लाचेची मागणी केल्यानंतर दोन लाखाचा पहिला हप्ता घेण्यासाठी आज टाकळीकर यांनी कंत्राटदाराला बोलविले. दरम्यान, लाच द्यायची नसल्यामुळे तीन महिन्यापूर्वीच कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने टाकळीकरच्या मुसक्या बांधण्यासाठी सापळा लावला. त्यानुसार लाचेचे दोन लाख रुपये घेऊन कंत्राटदार गुरुवारी टाकळीकर यांच्याकडे गेला. त्याने ही रक्कम त्यांचे वाहन चालक रेवतकर यांच्याकडे देण्यास सांगितले.
जिल्हा परिषदेच्या कार्यालय परिसरात रेवतकर यांनी टाकळीकर यांच्यासाठी दोन लाखाची लाच स्वीकारली. त्याचक्षणी आजूबाजूला दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने रेवतकर आणि टाकळीकर यांना जेरबंद केले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.