नाशकात प्रेमभंगातून अभियंत्याची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या? घटनास्थळी गावठी कटट्यासह आढळली रिकामी काडतुसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 05:27 PM2023-06-21T17:27:09+5:302023-06-21T17:30:39+5:30
सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील संदीप नाना सहाणे (२९) हा पत्नीसह श्री लंबोदर हाइट्स चेहेडी पंपिंग येथे राहत असून वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते.
लोमकत न्यूज नेटवर्क
नाशिक : चेहेडी पुलाजवळील श्री भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागील बाजूस नदीपात्राजवळील पायऱ्यांवर बुधवारी (दि.२१) सकाळी चेहेडी पंपिंग भागात राहणाऱ्या एका अभियंत्याने गावठी कट्ट्या मधून स्वतःच्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदीप नाना सहाणे (२९) असे आत्महत्या करणाऱ्या या अभियंत्याचे नाव असून त्याने प्रेमभंगातून स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मयत युवकाने गावठी कट्टा कुठून आणला असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला असून पोलिसांकडून तपास सुरू केला आहे.
सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील संदीप नाना सहाणे (२९) हा पत्नीसह श्री लंबोदर हाइट्स चेहेडी पंपिंग येथे राहत असून वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. तो सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील एका कंपनीत मॅकेनिकल इंजिनियर म्हणून कामाला होता. त्याची पत्नी चैताली ही देखील पुण्याच्या एका कंपनीत कामाला असून घरूनच ऑनलाइन काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संदीप हा पत्नी चैतालीला श्री महादेव मंदिरात दर्शन करून येतो असे सांगून नेहमीप्रमाणे घरून निघाला. मात्र बराच वेळ होऊनही तो पुन्हा परत आला नाही. त्यामुळे पत्नी चैताली हिने मोबाईलवर फोन केला असता संदीप यांने फोनही उचलला नाही. त्यामुळे चैतालीने चेहेडी पंपिंग भागात राहणारे संदीपचे मामेभाऊ समाधान भाऊसाहेब पगार यांना फोन करून सांगितले.
समाधान हा तत्काळ संदीप याच्या घरी आल्यावर चैताली हे दोघे मंदिराजवळ बघण्यास गेले. त्या ठिकाणी संदीपची दुचाकी लावलेली होती. परंतु, मंदिर परिसरात संदीप कुठेही दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी मंदीरामागील दारणा नदीपात्रात उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्यांकडे पाहिले. यावेळी नदीपात्रापासून तीसऱ्या पायरीवर संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्या ठिकाणी गावठी कट्टा, दोन रिकाम्या पुंगळ्या, संदीपचा मोबाईल मिळून आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नाशिकरोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपासानंतर संदीप याने स्वतःच्या हाताने गावठी कट्ट्यातून कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.