महावितरणचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 07:50 PM2019-12-18T19:50:45+5:302019-12-18T19:54:44+5:30
तक्रारदाराच्या घरच्या बोअरवेलमधून पाणी घेण्यासाठी लावलेल्या मोटारचा स्टार्टर कारवाई न करता परत देण्यासाठी अभियंत्याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती.
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील वीज वितरण केंद्रामधील कनिष्ठ अभियंता व एका खासगी इसमाला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १८ डिसेंबर रोजी सापळा रचून अटक केली आहे.
कनिष्ठ अभियंता पंकज अशोक अटकमवार (३२) व खासगी इसम प्रकाश बालय्या येरोला (३८) रा.सिरोंचा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराच्या घरच्या बोअरवेलमधून पाणी घेण्यासाठी लावलेल्या मोटारचा स्टार्टर कारवाई न करता परत देण्यासाठी अभियंत्याने १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र लाच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांच्याकडे केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. आठ हजार रुपयांची लाच खासगी व्यक्ती प्रकाश येरोला याने स्वीकारली. सदर रक्कम पंकज अटकमवार याला द्यायची असल्याचे सांगितल्यानंतर दोघांनाही एसीबीने अटक केली. सदर कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक यशवंत राऊत, पोलीस हवालदार प्रमोद ढोरे, नत्थू धोटे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, घनश्याम वडेट्टीवार यांनी केली.