पत्नी बनून मुलीने वडिलांच्या पेन्शनच्या 12 लाखांवर मारला डल्ला; 10 वर्षांनंतर झाली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 02:35 PM2023-08-09T14:35:36+5:302023-08-09T14:35:53+5:30
10 वर्षे कोणालाही याचा सुगावा लागला नाही. पण खोटं पकडलं गेलं.
उत्तर प्रदेशातील एटामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका मुलीने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर पेन्शनवर डल्ला मारला. पेन्शनच्या पैशावर पत्नी असल्याचं सांगून अनेक वर्षे आरामात जगली. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केली असता तिला अटक करण्यात आली. महिलेला न्यायालयात हजर केल्यानंतर तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
हे प्रकरण अलीगंज तहसीलच्या कुंचादायम खां मोहल्लाशी संबंधित आहे. येथे राहणारे विजारत उल्ला खां 30 नोव्हेंबर 1987 रोजी लेखपाल पदावरून निवृत्त झाले. याच दरम्यान विजारत उल्ला खानच्या पत्नी साविया यांचं निधन झाले. त्यानंतर 2 जानेवारी 2013 रोजी विजारत यांचेही निधन झाले.
विजारत यांची मुलगी मोहसिना परवेजने पेन्शन फॉर्ममध्ये स्वत:ला विजारत यांची पत्नी दाखवून पेन्शन घेण्यास सुरुवात केली. 10 वर्षे कोणालाही याचा सुगावा लागला नाही. पण खोटं पकडलं गेलं. मोहसिनासोबतही असंच काहीसं घडलं. ही बाब उपजिल्हाधिकारी मानवेंद्र सिंह यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली.
मोहसिनाने पेन्शन फॉर्ममध्ये पत्नी असल्याचं दाखवून पैशांचा गैरवापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अलीगंज कोतवालीमध्ये याबाबत एफआयआर दाखल केला होता. वरील प्रकरणात पोलिसांनी मोहसिनाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. ही महिला बऱ्याच दिवसांपासून फरार होती, तिला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी करण्यात आली. महिलेने आतापर्यंत 12 लाख रुपयांच्या पेन्शनवर डल्ला मारला.