७ वर्षापूर्वी लव्ह मॅरेज तरीही पतीने पत्नी आणि सासूला कायमचं संपवलं; नेमकं घडलं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 08:43 AM2024-12-03T08:43:42+5:302024-12-03T08:44:39+5:30
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून त्याने चौकशीत हत्येमागचं कारण सांगितले आहे.
बुलंदशहर - उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर इथं आरोपी पीटर जोसेफनं त्याची पत्नी आणि सासूची हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपी रक्ताळलेल्या मृतदेहांच्या बाजूला बेडवर बसला होता. हत्येच्या आधी घरातून जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकायला येत होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा पीटरच्या घरात गेले असता आतील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. २ जणांची हत्या करून आरोपी आरामात बेडवर बसला होता. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.
आरोपी पीटर जोसेफ पत्नी आणि सासूची हत्या करून तिथून पसार झाला नाही. पोलिसांनी त्याला अटक करून तपासाला सुरुवात केली. चौकशीत आरोपीनं पत्नी आणि सासूला मारण्यामागचं कारण सांगितले. तो म्हणाला की, माझं लग्न माझ्या नात्यातील कामिनी सिंह नावाच्या मुलीसोबत २०१७ साली झालं होते. आम्ही दोघांनीही लव्ह मॅरेज केले होते. कामिनीसाठी मी माझं कुटुंब, घरदार सगळं सोडले परंतु कामिनीने माझा विश्वासघात केल्याचा आरोप त्याने केला.
पत्नीचं सुरु होतं अफेअर
मला माझ्या पत्नीची हत्या करण्याचा पश्चाताप नाही त्यासाठी मी तिथून पळालो नाही. माझी पत्नी कामिनी मला धोका देत होती. तिचं दिल्लीतील एका मुलासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होते. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, अनेकदा तिला प्रेमाने सांगितले तरीही तिने ऐकले नाही. तिचे त्या मुलासोबत अफेअर सुरूच राहिले, त्यातून मी तिची हत्या केली. माझी सासू तिच्या मुलीला साथ देत होती असं चौकशीत आरोपी म्हणाला.
७ वर्षापूर्वी झालं होतं लव्ह मॅरेज
पीटर दिल्लीतील एका खासगी कंपनीत काम करतो. त्याने ७ वर्षापूर्वी कामिनी सिंह नावाच्या मुलीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर कामिनी तिच्या माहेरी राहत होती, पीटरही तिच्यासोबत तिथेच राहू लागला. लव्ह मॅरेज असतानाही पीटरला कामिनीवर संशय आला होता. लग्नाच्या काही दिवसांनी दोघांमध्ये भांडण सुरू झाले. कामिनी फोनवर बोलायची त्यामुळे तिचं कुणासोबत अफेअर असल्याचं सातत्याने पतीच्या मनात यायचे.
हत्येच्या दिवशी काय घडलं?
पीटरच्या सांगण्यांनुसार, हत्येच्या दिवशी रात्री कामिनी तिच्या प्रियकरासोबत फोनवर बोलत होती. पीटरने तिला फोनवर बोलण्यापासून रोखले परंतु तिने ऐकले नाही. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. हे भांडण इतक्या टोकाला गेले की रागाच्या भरात पीटरने पत्नीला मारून टाकले. पत्नीला मारताना सासू तिला वाचवण्यासाठी आली असता पीटरने तिचीही हत्या केली. सर्वकाही सोडूनही माझ्यासोबत विश्वासघात झाला. सततची भांडणे, श्वास गुदमरून जगू शकत नव्हतो असं आरोपीने पोलिसांना सांगितले.