परदेशातील तरुणीशी लग्न केल्यानंतरही थाटला दुसरा संसार अन् किडनी दानासाठी टाकला दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 10:02 PM2020-11-26T22:02:04+5:302020-11-26T22:03:14+5:30
Crime News : आपण सोबत संसार करु असे सांगितले, मात्र त्याची अंमलबजावणी केलीच नाही. म्हणून मानसी यांनी गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
जळगाव : श्रीलंकेत एकीशी विवाह झालेला असतानाही जळगावातील तरुणीशी विवाह केली व त्यानंतर किडनी दान करण्यासाठी दबाव टाकला म्हणून पती प्रवीण गिरधर चोपडे, सासरे गिरधर दामोदर चोपडे व सासु अलका गिरधर चोपडे (सर्व रा.डोंगलुर, बंगळुरु, कर्नाटक) यांच्याविरुध्द गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणूक व छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मानसी चंद्रकांत पाटील (२७, रा.दौलत नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी यांचे प्रवीण गिरधर चोपडे याच्याशी एमआयडीसीतील एका लॉनमध्ये अलिशान लग्न झाले होते. त्यांची विवाह नोंदणी अहमदाबाद येथे झाली होती. लग्नात आठ लाखाचे दागिने व अडीच लाखाचा धनादेश पतीला दिला होता. लग्नानंतर प्रवीण हा मानसीला मनीनगर, अहमदाबाद येथे नांदावयास घेऊन गेला. १५ दिवस सुखाचा संसार चालल्यानंतर पती सारखा मोबाईलवर बोलत असल्याने मानसीने विचारणा केली असता गलिच्छ बोलून तिला अपमानीत केले. तुला हाकलून देईल व नांदवणार नाही असे सांगून दम दिला. त्यानंतर १७ जून २०१७ रोजी प्रवीण अमेरिका जावून येतो असे सांगून घरुन निघून गेला. त्यानंतर अधूनमधून एक दोन वेळाच मोबाईलवर बोलला. त्यानंतर तीन महिने संपर्कच केला नाही.
श्रीलंकेच्या न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज
याच काळात मानसीला घरातील कागदपत्रांवरुन २६ जुलै २०१४ रोजी प्रवीण याचे श्रीलेंकेतील नीगे गौडा जिल्हा न्यायालयात दिमतू विजय शेखरा हिच्याशी लग्न झाले आहे व तेथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल आहे. या प्रकारावरुन जेव्हा वाद झाले तेव्हा मला दिमतू हीच हवी आहे, तू आमच्या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचे सांगून मानसीचा छळ सुरु केला. त्यानंतर घरातून हाकलून लावल्याचा प्रकार घडला. प्रवीण हा कामानिमित्त बंगळूरु, मुंबई व अहमदाबाद जात असताना त्या काळात सासुने हळूहळू करुन अंगावरील दागिने काढून घेतले. दरम्यानच्या काळात प्रवीण पोटदुखीची तक्रार करायचा. तेव्हाही घरातील डॉक्टरांच्या कागदपत्रांवरुन वाईट सवयीमुळे प्रवीण याच्या किडनी निकाम्या झाल्याचा समजले. उपचारासाठी मानसीच्या पैशावर मुंबई,बंगळुरु असे विमानाने सतत फेऱ्या केल्या. याच काळात पतीला तू किडनी दान कर म्हणून सासु-सासऱ्यांनी दबाव टाकला. सततच्या वादामुळे मानसी २०१८ पासून माहेरीच आहे. उपचारादरम्यान पतीला सासऱ्यांनीच किडनी दान केल्याचे समजले. यानंतरही मानसीने बंगळुरु येथे दोन-तीन वेळा प्रवीणची भेट घेतली. आपण सोबत संसार करु असे सांगितले, मात्र त्याची अंमलबजावणी केलीच नाही. म्हणून मानसी यांनी गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.