तुमच्या खात्यात एक रुपया नसला तरी लाखोंचा चुना लागू शकतो; फ्रॉड पाहून हादराल...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 01:22 PM2023-04-07T13:22:52+5:302023-04-07T13:23:33+5:30
तुम्हाला कल्पनाही करवणार नाही की तुम्ही अशाप्रकारे फ्रॉडची शिकार बनाल. एका महिलेसोबत असे घडले आहे.
तुमच्या खात्यात पैसे असतील आणि ते कोणीतरी फसवून काढले तर ठीक परंतू जर तुमच्या खात्यात पैसे नसतील तरी तुम्हाला लाखोंचा चुना लावला गेला तर काय कराल? असे कसे शक्य आहे असाच विचार तुम्ही करत असाल ना... परंतू पुढचे वाचून तुम्ही हादराल.
तुम्हाला कल्पनाही करवणार नाही की तुम्ही अशाप्रकारे फ्रॉडची शिकार बनाल. एका महिलेसोबत असे घडले आहे. सध्या ती एवढी घाबरलीय की स्वत:च्या सुरक्षा आणि खासगीपणाबाबत चिंतित आहे. एका लिंकचा मेसेज तिला फ्रॉड व्यक्तीने पाठविला होता. तिने ट्रेनचे तिकीट बुक केले होते. परंतू तिने ते रद्द केले आणि त्याच्या रिफंडसाठी गुगलवर कस्टमर केअर नंबर सर्च मारला होता.
तिकीट रद्द केल्यानंतर तिच्या खात्यात शून्य रुपये बॅलन्स दिसत होता. यामुळे तिने कस्टमर केअरला फोन करण्याचा निर्णय घेतला होता. गुगलवर नंबर मिळाला परंतू तो त्या फ्रॉड व्यक्तीचा होता. त्या महिलेनुसार हा नंबर आयआरसीटीच्या वेबसाईटवर दिसत होता. तिने फोन केला तेव्हा त्याने तिला एक लिंक पाठवून तक्रार देण्यास सांगितले. महिलेने त्या लिंकवर क्लिक केले. महिलेने थोडा संशय घेतला तेव्हा त्याने मी ओटीपी मागत नाही, असे सांगत तिला विश्वासात घेतले.
महिलेने लिंकवर क्लिक करताच त्याला तिच्या फोनचा पूर्ण अॅक्सेस मिळाला. त्याने तिला आणखी विश्वास दाखविण्यासाठी तिची ट्रेन तिकीटाची डिटेल्स सांगितले. तोवर त्याने तिच्या मोबाईलमध्ये एक अॅप इन्स्टॉल केले. याद्वारे तिच्या बँक अकाऊंटचा अॅक्सेस घेतला आणि तिच्या खात्यावर पर्सनल लोन मिळविले. यासाठी दोन मिनिटांत लोन अशा सारख्या अॅपचा वापर झाला. महिलेच्या खात्यात तीन लाख रुपये होते.
सुरुवातीला त्याने पेयी अॅड केले. तिच्या खात्यातून तीन लाख रुपये वळते केले आणि नंतर आणखी 2.96 लाख रुपयांचे पर्सनल लोन काढले. महिलेला याचा अंदाज येईस्तोवर त्याने पाच लाख रुपयांचे घपला केला होता. यात तिच्या क्रेडिट कार्डवरून दोन लाख रुपये वळते केले होते. एक दिलासादायक बाब म्हणजे त्याला पर्सनल लोनचे पैसे वळते करता आले नव्हते. तोवर महिलेने सावध होत बँक खाते ब्लॉक केले होते.
तीन लाख रुपये असलेले खाते तिचे सॅलरी अकाऊंट होते. तेवढेच पैसे तिच्याकडे होते. अन्य खाती होती परंतू त्यात फार कमी पैसे होते. तरी तिच्याकडून पाच लाख रुपये काढून घेण्यात आले. पर्सनल लोनचे पैसे देखील गेले असते तर ही रक्कम आठ लाखांवर गेली असती. आता या महिलेला पैसे कधी मिळतील याची काही माहिती नाहीय, असे तिने सांगितले.