दर तीन दिवसांनी एक शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:26 AM2018-03-19T00:26:26+5:302018-03-19T00:26:26+5:30
पीक विमा, नुकसान भरपाई आणि त्यानंतर कर्जमाफी अशा एकापाठोपाठ योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविल्या, परंतु या सर्व योजना फसव्याच असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन दिसते़ दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजामुळे नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे़ गेल्या अडीच महिन्यांत दर तीन दिवसाला एका शेतक-याने मृत्यूला कवटाळले आहे़ विशेष म्हणजे आजच्या दिवशी ३२ वर्षांपूर्वी केलेली शेतकरी आत्महत्या ही पहिली आत्महत्या असल्याची शासनदप्तरी नोंद आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पीक विमा, नुकसान भरपाई आणि त्यानंतर कर्जमाफी अशा एकापाठोपाठ योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविल्या, परंतु या सर्व योजना फसव्याच असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन दिसते़ दुष्काळी परिस्थिती आणि कर्जाच्या बोजामुळे नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे़ गेल्या अडीच महिन्यांत दर तीन दिवसाला एका शेतक-याने मृत्यूला कवटाळले आहे़ विशेष म्हणजे आजच्या दिवशी ३२ वर्षांपूर्वी केलेली शेतकरी आत्महत्या ही पहिली आत्महत्या असल्याची शासनदप्तरी नोंद आहे़
शाश्वत सिंचनाची कुठलीही सोय नसलेल्या नांदेड जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागतात़ त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळणे दुरापास्त बनते. केवळ निसर्गाच्या भरवशावर शेतक-यांची सर्व मदार आहे़ परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी दुष्टचक्रात अडकला आहे़
शेतकºयाला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली़ परंतु त्यानंतरही आत्महत्येचा फेरा सुरुच आहे़ कर्जमाफीसाठीच्या किचकट नियमात शेतकरी अडकले़
गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात ६४५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या़ तर नवीन वर्षात जानेवारीमध्ये ६, फेब्रुवारीत ११ व मार्चमध्ये ३ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे़ त्यात यंदा कपाशीला बोंडअळीचा मोठा फटका बसला़ नगदी पीक असलेल्या कापसाचे त्यामुळे मोठे नुकसान झाले़ त्यानंतर लगेचच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांना तडाखा दिला़ त्याचबरोबर शेकडो हेक्टरवरील फळबागांचेही अतोनात नुकसान झाले़ जवळपास २२ हजार हेक्टरवरील पिकांचे त्यामुळे नुकसान झाले़ त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे काही ठिकाणी पिकांना त्याचाही फटका बसला़ अशा लागोपाठ अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़
‘आप’चे उपोषण
१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व चार मुलांसह पवनार जवळील दत्तपूर येथे जावून सामूहिक आत्महत्या केली होती़ ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते़ सोमवारी या घटनेला ३२ वर्षे होत आहेत़ त्यामुळे आम आदमी पक्षाच्या वतीने सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आप’चे बालाजी आबादार यांनी दिली़