फेसबुकवर कंपनीची बदनामी प्रकरणी माजी एसीपीच्या मुलावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 05:33 AM2023-09-18T05:33:54+5:302023-09-18T05:34:19+5:30
या भेटीत नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याचे त्याने सांगितले. सिद्धेश हा महिला व तिच्या भावाच्या संपर्कात असल्याने अधून-मधून त्यांच्या कार्यालयात यायचा.
मुंबई : खासगी लायसनिंग कंपनीचे फेसबुक लॉगिन करून बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या माजी एसीपी सुनील घोसाळकर यांचा मुलगा सिद्धेश (३१) याच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
तक्रारदार महिला व त्यांच्या भावाने खासगी लायसनिंग सर्व्हिस देणारी कंपनी सुरू केली. कुठल्याही प्रकारच्या इव्हेंटसाठी आवश्यक असणारे सर्व परवाने योग्य त्या डिपार्टमेंटमधून काढून देण्याचे काम या कंपनीतून सुरू होते. कंपनीची जाहिरात करण्यासाठी त्यांनी फेसबुकवर अकाउंट सुरू केले. २०२० मध्ये एसीपी घोसाळकर यांनी बीबीए झालेला त्यांचा मुलगा सिद्धेश याला काम शिकवण्याची विनंती त्यांच्याकडे केली.
त्यांनी होकार देताच सिद्धेश कंपनी मालक असलेल्या महिलेला भेटला. या भेटीत नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याचे त्याने सांगितले. सिद्धेश हा महिला व तिच्या भावाच्या संपर्कात असल्याने अधून-मधून त्यांच्या कार्यालयात यायचा. इतकेच नव्हे तर त्यांचा संगणकदेखील तो हाताळायचा. दरम्यानच्या काळात व्यवसाय सुरू करायचे सांगून सिद्धेशने त्यांच्याकडे पैसे मागितली. एसीपी घोसाळकर यांच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांनी त्याला पैसे दिले. मात्र, तो वेगवेगळी कारण देत वारंवार पैशांची मागणी करू लागल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याचाच राग मनात ठेवून सिद्धेशने कंपनीचे फेसबुक अकाउंट हॅक करत बदनामीकारक पोस्ट केली. या प्रकरणी सायबर क्राइमकडे तक्रार केली. सिद्धेश हादेखील कंपनीच्या फेसबुक अकाउंटचा ॲडमिन असल्याचा दावाही तक्रारदारांनी केला आहे.
क्लायंटनाही धमकावले
कंपनीशी जुडलेल्या क्लायंटना काम थांबवण्याचा इशारा सिद्धेशने दिला. काम बंद न केल्यास तुमचीही बदनामी करू, असे सिद्धेशने धमकावले, असा आरोप महिलेने तक्रारीत केला असल्याचे बीकेसी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान,
सिद्धेश याने क्रिकेटर विराट कोहलीच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट बनवून त्यावरून कंपनीची बदनामी केली. ज्याचे स्क्रीन शॉट्स तक्रारदाराने पोलिसांना दिले असून त्याबाबत तांत्रिक तपास सुरू आहे.