भाजपच्या माजी नगरसेवक दांपत्याच्या मुलाची फसवणूक; आरोपीला पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 10:46 AM2022-04-30T10:46:12+5:302022-04-30T10:46:19+5:30
अक्षय भीमा बोबडे (वय २७, रा. यमुनानगर, निगडी) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. २९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पिंपरी : भाजपचे माजी नगरसेवक भीमा बोबडे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका अश्विनी बोबडे यांचा मुलगा अक्षय यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अक्षय यांच्या चारचाकी वाहनाचा क्रमांक वापरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करून त्याचा दंड भरायला लावून ही फसवणूक करण्यात आली. पिंपरी येथे २२ जानेवारी ते २८ एप्रिल या कालावधीत हा प्रकार घडला.
अक्षय भीमा बोबडे (वय २७, रा. यमुनानगर, निगडी) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. २९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शैलेश मधुकर धरपाळे (वय ३४, रा. डोंगरवाडी, लोणावळा, ता. मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे माजी नगरसेवक भीमा बोबडे व माजी नगरसेविका अश्विनी बोबडे यांचा मुलगा असलेल्या अक्षय बोबडे यांच्याकडे एमएच १४ जेए ०१११ या क्रमांकाची फोर्ड कंपनीची इंडीव्होर गाडी आहे.
फिर्यादीच्या या गाडीचा हा क्रमांक आरोपीने त्याच्या चार चाकी वाहनांसाठी वापरला. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी आरोपीच्या गाडीवर दंडात्मक कारवाई केली. त्या दंडाच्या दोन हजार रुपये रकमेचे चलन फिर्यादी यांना मिळाले. फिर्यादी यांना ते चलन भरायला लावून आरोपीने त्यांची फसवणूक केली.
फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर दंड आकारण्यात आलेल्या गाडीच्या फोटोंवरून आरोपीच्या वाहनाचा शोध घेण्यात आला. त्यानुसार कारवाई करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस हवालदार अभिजित कुंभार तपास करीत आहेत.