'हा माझा एरिया आहे, नियम पण माझेच', माजी महापौराची वाईन शॉपच्या कर्मचाऱ्यांना मारहाण
By राम शिनगारे | Published: November 24, 2022 10:08 PM2022-11-24T22:08:42+5:302022-11-24T22:09:36+5:30
एन १२ येथील घटना : सिडको पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल
औरंगाबाद : शहराच्या माजी महापौराने सहकाऱ्यासह वाईन शॉपीमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात २३ नोव्हेंबर रोजी माजी महापौरांसह तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
माजी महापौर सुदाम सोनवणे, संदीप कांबळे आणि बापू देशमुख यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सिडको ठाण्यात स्वप्नील भिकन गुंजाळ (२८) याने दिलेल्या फिर्यादीनुसार एन १२ परिसरातील एम.आर. वाईन शॉपमध्ये २१ नोव्हेंबर रोजी रात्री दिवसभरचा हिशोब करून बंद करण्याच्या तयारी होता. तेव्हा माजी महापौर सुदाम सोनवणे यांच्यासह दोघेजण बळजबरीने वॉईन शॉपमध्ये घुसले आणि ‘दहाच्या आत दुकान बंद झाले पाहिजे, कोणाकडे तक्रार करायची ती कर, पोलिस काय करतात ते बघून घेईन, दुकान बंद नाही केले तर गाठ माझ्याशी आहे’ असे म्हणत स्वप्नीलला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारण्यास सुरवात केली.
स्वप्नीलचे सहकारी सोडविण्यास आला असता, त्यांनाही मारहाण केली. तसेच ‘हा माझा एरिया आहे, माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर शासनाच्या नियमानुसार नाही, तर माझ्या नियमानुसार धंदा करावा लागेल’ असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत फिर्यादी स्वप्नीलच्या कानावर जोरात ठोसा मारल्याने त्याला ऐकू येणे बंद झाले आहे.