कार कॉलेजचे माजी प्राचार्य, विभागप्रमुख ताब्यात; पीडितेच्या पालकांचा सहकारी डाॅक्टरांवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 01:31 PM2024-08-17T13:31:02+5:302024-08-17T13:31:47+5:30

रुग्णालयावरील हल्ल्याप्रकरणी २० अटकेत

Ex-Principal Head of Department of Kar College detained as victim parents suspect fellow doctors | कार कॉलेजचे माजी प्राचार्य, विभागप्रमुख ताब्यात; पीडितेच्या पालकांचा सहकारी डाॅक्टरांवर संशय

कार कॉलेजचे माजी प्राचार्य, विभागप्रमुख ताब्यात; पीडितेच्या पालकांचा सहकारी डाॅक्टरांवर संशय

काेलकाता: येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट राेजी एका कनिष्ठ महिला डाॅक्टरवर झालेला अत्याचार व तिच्या हत्येबद्दल शुक्रवारी सीबीआयने महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डाॅ. संदीप घाेष यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासाेबत छातीविकार विभागाचे प्रमुख डाॅ. अरुनव दत्ता चाैधरी यांनाही सीबीआयने ताब्यात घेण्यात आले आहे. चाैधरी यांनी १ ऑगस्ट राेजी या विभागाचा कार्यभार स्वीकारला हाेता.

रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागावर हल्ला प्रकरणी शुक्रवारी दुपारपर्यंत पाेलिसांनी २० आराेपींना अटक केली आहे. गुरुवारी दुपारी एका जमावाने हा हल्ला केला हाेता. याप्रकरणी उच्च न्यायालयानेही राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. जिथे पाेलीस स्वत:चे रक्षण करु शकत नाही, तिथे डाॅक्टर निडर हाेऊ काम कसे करतील? असा सवाल न्यायालयाने केला.

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शुक्रवारी या घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या नागरिकांच्या माेर्चात सहभागी झाल्या. यातील दाेषींना मृत्युदंड देण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. दुसरीकडे ‘आयएमए’ने १७ ऑगस्ट राेजी या घटनेच्या निषेधार्थ अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी सेवा बंद ठेवण्याची घाेषणा केली.

बाॅलीवूड कलाकारांकडून तीव्र निषेध

  • देशभर डाॅक्टरांनी निषेध आंदाेलन सुरू केल्यानंतर आता बाॅलीवूडही सरसावले असून, याप्रकरणी तातडीने न्याय करावा, अशी मागणी अभिनेता हृतिक राेशन, आलिया भट, करिना कपूर, कृती सनाॅन यांनी केली आहे. डाॅक्टरांच्या आंदाेलनास या कलाकारांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
  • साेशल मीडियावर हृतिकने म्हटले आहे की, अशा अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठाेर न्याय हवा. यासाठी अति कठाेर शिक्षा हाच खरा उपाय आणि गरज आहे, तरच गुन्हेगारांवर वचक बसू शकेल. या घटनेच्या निषेधार्थ आंदाेलन करणाऱ्या डाॅक्टरांवर झालेल्या हल्ल्याचाही त्याने निषेध केला.
  • अभिनेत्री आलिया भट, करिना कपूर, निर्मात्या झाेया अख्तर, निर्माता-अभिनेता फरहान अख्तर, सारा अली खान, प्रियंका चाेप्रा, अभिनेता विजय वर्मा, ट्विंकल खन्ना यांनीही महिला सुरक्षितेच्या दृष्टीने या घटनेचा निषेध करीत न्यायाची मागणी केली आहे.


पीडितेच्या पालकांचा आराेप

मृत प्रशिक्षणार्थी महिला डाॅक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील काही कर्मचाऱ्यांसह डाॅक्टरांचाही सहभाग असल्याचे पीडितेच्या माता-पित्याने केला आहे. सीबीआय चाैकशीत त्यांनी हा दावा केला. ज्या लाेकांवर या प्रकरणात संशय आहे अशांची नावेही त्यांनी सीबीआयकडे दिली आहेत.

सीसीटीव्ही फुटेजवरून अटक

  • रुग्णालयावर हल्ला झाल्यानंतर पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवून ९ जणांना तत्काळ अटक केली. तर, या सर्वांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उर्वरित आराेपींना ताब्यात घेण्यात आले.
  • काेलकाता उच्च न्यायालयाने अत्याचार व हत्या प्रकरणाचा तपास पाेलिसांकडून काढून घेत सीबीआयकडे साेपवल्यानंतर काेलकात्याचे पाेलिस आयुक्त विनीत गाेयल यांनी पत्रकार परिषदेत अटकेसंबंधी माहिती दिली. सुमारे ७ हजार लाेकांच्या जमावाने रुग्णालयावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले हाेते.


दिल्लीत प्रतिबंधात्मक आदेश

काेलकाताप्रकरणी विविध संघटनांनी पुकारलेल्या निषेध आंदाेलनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पाेलिसांनी शुक्रवारी महानगरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले हाेते. विशेषत: संसद परिसरात अधिक दक्षता घेतली जात आहे. 

Web Title: Ex-Principal Head of Department of Kar College detained as victim parents suspect fellow doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.