माजी सैनिकाची जळगाव जिल्ह्यात आत्महत्या; पत्नी व मुलगा घरात असताना घडली दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 04:42 PM2020-06-30T16:42:47+5:302020-06-30T16:43:05+5:30
प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : सैन्य दलातून निवृत्त झालेले व सध्या एस.टी.महामंडळात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत असलेल्या गणेश भीकन कोळी (४५, मुळ रा.तुरखेडा, ता.जळगाव) यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता असोदा, ता.जळगाव येथे घडली. कोळी यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश कोळी हे मुळचे तुरखेडा येथील रहिवाशी होते, मात्र अनेक वर्षापासून ते असोदा येथे वास्तव्याला होते. सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) नोकरीला होते. दोन वर्षांपूर्वी ते सैन्यातून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते एस.टी. डेपोत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. मंगळवारी दुपारी १.३० वाजता पत्नी, मुलगा व मुलगी घराच्या पुढच्या गॅलरीत बसले होते. त्यांनी मागच्या घरात जावून नॉयलॉन दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
पतीने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच पत्नी कल्पना कोळी यांनी हंबरडा फोडला. आरडाओरड केल्यानंतर गल्लीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह खाली उतरवला. तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. घटनेची माहिती तालुका पोलीसांना दिल्यानंतर जिल्हा रूग्णालयात येवून पंचनामा केला. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कोळी यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगा राहूल आणि मोठी मुलगी पूनम असा परिवार आहे.