अतिप्रसंग करून म्हणाला, 'तुला जे करायचे ते कर'; राजापेठ हद्दीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 04:21 PM2023-04-16T16:21:05+5:302023-04-16T16:21:19+5:30

आरोपी तेवढ्यावरच न थांबता त्याने प्रेयसीला तुला जे करायचे ते कर, मात्र लग्न करणार नाही, अशी गर्भित धमकी दिली. 

Exaggerating, he said, 'Do what you have to do'; Incidents in Rajapeth area | अतिप्रसंग करून म्हणाला, 'तुला जे करायचे ते कर'; राजापेठ हद्दीतील घटना

अतिप्रसंग करून म्हणाला, 'तुला जे करायचे ते कर'; राजापेठ हद्दीतील घटना

googlenewsNext

अमरावती : एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करण्यात आला. मात्र, तिने लग्नाबाबत विचारणा करताच, तगादा लावताच आरोपीने ‘तो मी नव्हेच’चा पवित्रा घेतला. आरोपी तेवढ्यावरच न थांबता त्याने प्रेयसीला तुला जे करायचे ते कर, मात्र लग्न करणार नाही, अशी गर्भित धमकी दिली. 

एकीकडे लुटलेले सर्वस्व व दुसरीकडे लग्नास मिळालेल्या नकारामुळे ती कोसळली आणि तिने अखेर पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी अद्वैत प्रकाश चव्हाण (४३, रा. अमरावती) याच्याविरुद्ध १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास बलात्कार व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, पीडित व आरोपींची काही वर्षांपूर्वी परस्परांशी ओळख झाली. प्रेमाच्या आणाभाका झाल्या. त्यातून त्याने तिचा विश्वास संपादन केला. १३ ऑगस्ट २०२२ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत त्याने तिला लग्नाचे आमिष दिले. आपण लग्न करणारच आहोत, तर मग बिघडले कुठे, असे म्हणून त्याने तिच्याशी सुमारे आठ महिने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने तिला स्वत:च्या घरी थांबवून घेतले तथा अनेकदा तिचे सर्वस्व लुटले. १५ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते ९ च्या सुमारास आरोपीने स्वत:च्या घरी पुन्हा एकदा तिच्यावर बळजबरी केली.

लग्नास ठामपणे नकार
१५ एप्रिल रोजी तिने त्याला लग्नाबाबत पुन्हा विचारणा केली. समाजात आपली बदनामी होत आहे. लग्न करून आपण छान संसार करू, असे तिने म्हटले. मात्र, आतापर्यंत ‘आज करू, उद्या करू’ असे म्हणणाऱ्या अद्वैतने थेट नकाराचा पाढा वाचला. आपल्याला तुझ्यासोबत लग्न करायचे नाही, तुला जे करायचे आहे, ते तू करून घे, मी कुणालाही भीत नाही, असे म्हणत त्याने लग्नास ठामपणे नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने १५ एप्रिल रोजी सायंकाळी राजापेठ पोलिस ठाणे गाठले. तेथे महिला पोलिस अधिकाऱ्यांनी तिची तक्रार नोंदवून घेतली.

Web Title: Exaggerating, he said, 'Do what you have to do'; Incidents in Rajapeth area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.