पापाचे खोदकाम सुरूच, आणखी एक कवटी सापडली; वर्धा-नागपूरच्या तज्ज्ञांकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 08:14 AM2022-01-15T08:14:44+5:302022-01-15T08:15:35+5:30
गर्भपात प्रकरणात पोलिसांनी बायोगॅस खड्ड्यातून गुरुवारपर्यंत ११ मानवी कवट्या आणि ५४ हाडे जप्त केली होती.
देऊरवाडा/आर्वी (जि. वर्धा) : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या आर्वी येथील गर्भपात प्रकरणात शुक्रवारी सकाळपासून नागपूर आणि वर्ध्यातील फॉरेन्सिक एक्सपर्ट तसेच आरोग्य विभागाच्या चमूने तपासणी करून कदम हॉस्पिटलमधील पापाचे खोदकाम केले. शुक्रवारी आणखी एक कवटी तपास पथकाच्या हाती लागली.
या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी बायोगॅस खड्ड्यातून गुरुवारपर्यंत ११ मानवी कवट्या आणि ५४ हाडे जप्त केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नागपूर आणि वर्ध्यातील फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स तसेच आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांसह पोलिसांनीही कदम हॉस्पिटलच्या आत व बाहेर तपासणी केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, ठाणेदार भानुदास पिदुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनवणे, पाेस्को सेलच्या ज्योत्सना गिरी यांच्यासह मोठा पोलीस ताफा उपस्थित होता. खबरदारी म्हणून तपासणी व चौकशीदरम्यान कुणालाही रुग्णालय परिसरात फिरकू देण्यात आले नाही. तपास पथकाने बायोगॅसचा टॅंक तसेच गडर टॅंकही स्वच्छता कर्मचाऱ्याच्या हाताने तपासून घेतली. या तपासणीत मेडिकल बायोवेस्टसह वेगवेगळे संशयास्पद साहित्य पोलिसांच्या हाती लागले.
खोदकामात सुटली दुर्गंधी
रुग्णालय परिसरात खोदकामादरम्यान प्रचंड दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे या खड्ड्यात आणखी काही अवशेष सापडतात काय, हेदेखील तपासण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत बायोगॅस खड्ड्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आरोग्य विभागाची भूमिका संशयास्पद : डाॅ. आशा मिरगे
अवैध गर्भपात प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य पद्धतीने केला जात असला तरी या प्रकरणात आरोग्य विभागाची भूमिका संशयास्पदच आहे. या प्रकरणात आरोग्य विभागातील कोण अधिकारी दोषी आहे, याचा शोध घेणे गरजेचे असून, या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण आरोग्यमंत्री, तसेच गृहमंत्र्यांकडे रेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पीसीपी एनडीटी मंडळाच्या अशासकीय सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी पत्रपरिषदेत दिली.