तस्करांवर उत्पादन शुल्क करणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 04:09 AM2018-12-22T04:09:31+5:302018-12-22T04:09:44+5:30
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या थर्टीफर्स्ट आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर, उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. गुजरातमार्गे नेहमीच मोठ्या प्रमाणात कर चुकवून येणाऱ्या दारू तस्करांसह बनावट दारू राज्यात येऊ नये म्हणून राज्याच्या हद्दीवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.
मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या थर्टीफर्स्ट आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर, उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. गुजरातमार्गे नेहमीच मोठ्या प्रमाणात कर चुकवून येणाऱ्या दारू तस्करांसह बनावट दारू राज्यात येऊ नये म्हणून राज्याच्या हद्दीवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.
नाताळ आणि थर्टीफर्स्ट जोरदार साजरा केला जातो. त्यासाठी हॉटेल्स, क्लबनी केव्हाच तयारी सुरू केली आहे. या दिवसांमध्ये दारूचा खप सर्वाधिक होतो. विविध मोठमोठ्या पार्ट्यांसाठी दारू ठेवण्यात येते. आयोजक या पार्ट्यांमधून जास्तीत जास्त फायदा मिळावा यादृष्टीने पाहत असतो. मात्र राज्यात दारूवर जास्त प्रमाणात कर आकारण्यात येत असल्याने त्यामानाने गुजरातमध्ये दारूवर कमी कर आकारला जात असल्याने आयोजक गुजरातमधून स्वस्त दारू आणण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक जण गुजरात मार्गे वाहनांमधून कर चुकवून राज्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी करून राज्याचा मोठ्या प्रमाणात कर बुडवितात.
अशा पद्धतीने कर बुडविणाºयांवर चाप बसविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी आणि विभागीय उपआयुक्त टी. आर. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके नेमण्यात आली आहेत. त्यात मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर विभागांतील निरीक्षकांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांची दापचारी, तलासरी, उधवा, झाई, आमगाव इत्यादी गुजरात दिशेने राज्यात येणाºया रस्त्यांवर चक्राकार पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून ३१ जानेवारीपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कळविण्यात आले आहे.
तसेच राज्यात अनेक महामार्ग जात असून या महामार्गावरील हॉटेल्स, धाब्यांवर दीव व दमण व इतर कंपनीच्या बनावट दारूची विक्री केली जाते. अनेक वेळा उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून कंटेनरसारख्या वाहनातून कर चुकवून आणलेले मद्य, बनावट दारू पकडली आहे. थर्टीफर्स्ट आणि नाताळ या काळात अशी कर चुकवून आणलेली दारू सर्रासपणे विक्री केली जाते. त्यामुळे बेकायदा मद्याची आवक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने संपूर्ण गुजरात मार्गावर तपासणी सुरू केली आहे.
१ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंतची कारवाई
या पथकांना गुजरात मार्गे कर चुकवून तस्करांनी आतापर्यंत आणलेली १७ लाखांची अवैध दारू पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून २५ वाहने जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.