जावळी तालुक्यात उत्पादन शुल्कची धडक कारवाई, तब्बल २४ जणांना अटक
By दत्ता यादव | Published: July 31, 2023 09:46 PM2023-07-31T21:46:03+5:302023-07-31T21:46:12+5:30
जावळी तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारू अड्डे सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी जावळी तालुक्यात दोन दिवस तळ ठोकून दारू अड्ड्यांवर छापे टाकले.
सातारा : जावळी तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या अवैध दारू विक्री अड्ड्यांवर उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत २४ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १५ हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. २९ ते ३० जुलै या दोन दिवसांच्या कालावधीत करण्यात आली.
जावळी तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारू अड्डे सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी जावळी तालुक्यात दोन दिवस तळ ठोकून दारू अड्ड्यांवर छापे टाकले. या छाप्यामध्ये अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दारूसाठा हाती लागला. तर २४ जणांना अटक करण्यात यश आले.
ही धडक कारवाई उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा, पुणे आणि फलटण विभागांच्या संयुक्त पथकाने राबविली. या पथकामध्ये निरीक्षक एस. डी. खरात, एम. एस. चव्हाण, एम. व्ही. गायकवाड, दुय्यम निरीक्षक प्रतीक ढाले, जितेंद्र देसाई, के. बी. नडे, एस. एस. काळे, के. डी. यादव, सहायक दुय्यम निरीक्षक मोहिते, खरात, जवान नरेंद्र कलकुटगी, महेश देवकर, शंकर चव्हाण, मनीष माने, आप्पा काळे, अजित घाडगे, अरुण जाधव, किरण जंगम, आबा जानकर, सुरेश अब्दागिरी यांचा सहभाग होता.
दरम्यान, जिल्ह्यात बनावट दारू तसेच हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, वाहतूक होत असेल तर तत्काळ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी केले आहे.