अमरावती येथे एक्साईजचा निरीक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 10:14 PM2020-12-22T22:14:00+5:302020-12-22T22:14:09+5:30
३० हजारांची लाच, हप्ता मागणारा सहायक दुय्यम निरीक्षक पसार
अमरावती : राज्य उत्पादन शुल्क विभागात अमरावती येथे निरीक्षकाला मंगळवारी ३० हजारांच्या लाचप्रकरणी अटक करण्यात आली. अमरावती येथील रेस्टॉरंट व बार मालक असलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तक्रारदाराला दोन हजार रुपये दरमहा हप्ता मागणारा सहायक दुय्यम निरीक्षक पसार झाला आहे.
दिलीप बापू कोळी (५५, रा. वायपे पवारनगर, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या निरीक्षकाचे आणि अरविंद मोतीराम नांदणे (४०) असे सहायक दुय्यम निरीक्षकाचे नाव आहे. बीअर बार लायसन्स काढून देण्यासाठी मदत केल्याबद्दल मोबदल्यात दिलीप कोळी याने ४५ हजारांच्या लाचेची मागणी तक्रारदाराला केली होती. त्याचा पहिला टप्पा म्हणून ३० हजार रुपये देण्यास त्यांनी सांगितले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्यानंतर ३ डिसेंबर व २१ डिसेंबर रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान अरिवंद नांदणे याने तक्रारदाराला दरमहा दोन हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केल्याचे मान्य केले. मंगळवारी लाचलुचपत विभागाने सापळा रचला. दिलीप कोळी याने तक्रारदाराला ३० हजार रुपये घेऊन कॅम्प परिसरातील वासुदेव अपार्टमेंट या निवासस्थानी बोलावले. मुख्य गेटजवळ दिलीप कोळी याने लाचेची रक्कम घेताच त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (२६ जुलै २०१८ चे संशोधन) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईची वार्ता कळताच सहायक दय्यम निरीक्षक अरविंद नांदणे हा पसार झाला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल तसरे, नायक पोलीस शिपाई विनोद कुंजाम , युवराज राठोड, सुनील जायभाये, वाहनचालक अकबर हुसैन यांनी ही कारवाई केली.