खळबळजनक! शिवाजीनगर न्यायालयातील 'त्या' बेपत्ता वकिलाचा खून; तीन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 04:19 PM2020-10-19T16:19:42+5:302020-10-19T16:37:05+5:30
'दृश्यम' फेम पोलिसांना 'मिसगाईड' करण्याचा आरोपींचा प्रयत्न...
पुणे : शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करणारे अॅड. उमेश मोरे १ ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले होते. बरेच दिवस उलटून गेल्यावर देखील त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण मोरे यांचा जमिनीच्या वादातून खून झाला असल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासातुन समोर येत आहे.
या खूनप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर व रोहित दत्तात्रय शेंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 1 कोटी 70 लाख लाचप्रकरणी अटक केलेल्या वकिलाचा समावेश आहे.
अॅड. उमेश मोरे हे बऱ्याच वर्षांपासून शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टिस करत होते. १ ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे न्यायालयात कामकाजासाठी आले होते. तिथे काही मित्रांना सुद्धा भेटले. त्यानंतर पत्नीशी बोलले आणि नऊ वाजता घरी येतो असे सुद्धा सांगितले. पण रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी त्यांच्या कुटुंबाने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
इतक्या दिवसांनंतर देखील उमेश मोरे यांचा शोध न लागल्यामुळे नेमके त्यांच्याबाबतीत काय घडले असावे असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पोलिसांनी त्यांच्या तपासादरम्यान न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले होते. त्यात 2 संशयित व्यक्ती निदर्शनास आल्या होत्या. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक देखील स्थापन केले होते.
'दृश्यम' फेम पोलिसांना मिस गाईड करण्याचा आरोपींचा प्रयत्न...
ताम्हिणी घाटात मोरे यांचा मृतदेह जाळून केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच दृश्यम चित्रपटाप्रमाणे आरोपींनी पोलिसांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला. वकील मोरे यांचा मोबाईल त्यांनी एक तरकरीच्या गाडीत टाकला. ती गाडी फिरत राहिली व मार्केटयार्डला गेली. तेथे एका व्यापाऱ्याला तो मोबाईल सापडला. आणि पोलिसांना या घटनेतील महत्वाचा धागा दोरा मिळाला. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि या अपहरण व खून प्रकरणाचा उलगडा झाला.