पुणेकर महिलेशी बोलणे पडले महाग; धुळ्याच्या युवकाचे नाशकात आणून केले मुंडण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 10:02 PM2021-07-01T22:02:46+5:302021-07-01T22:05:32+5:30
Crime News : पाच संशयितांना अटक; बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नाशिक : पुणेकर असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्यासोबत मोबाइलवर सातत्याने मेसेज करत त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्यासाठी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न धुळ्याच्या एका युवकाला चांगलाच भोवला. पुण्यातील काही संशयितांच्या टोळक्याने धुळे गाठून त्या युवकाला मारहाण करत बळजबरीने मोटारीत टाकून नाशिकच्या पंचवटीत आणून मुंडण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणेकर महिलेसोबत मोबाइलवरुन बोलणे आणि चॅटिंग करणाऱ्या १८वर्षीय फिर्यादी विलास चव्हाण या तरुणाला पुण्यातील संशयित आरोपी सोनाली निंबाळकर(३४,रा. स्ट्रीट कॅम्प,पुणे), जयसिंगकौर तेजिंदरसिंग छाबडा(३४), निलेश सुरेश जाधव(३९,रा.लक्ष्मीनगर, पुणे), राहुल निंबाळकर(३३,रा. हॅपी कॉलनी, पुणे), सागर शिवाजी गायकवाड(३१) यांनी धुळे गाठून त्यास घरातून बाहेर बोलावून मोटारीत (एम.एच.१४ बीएक्स ८३२६) डांबले आणि बेदम मारहाण केली. हात पाय बांधून मोटार थेट नाशिकच्या दिशेने दामटविली. येथील पंचवटी भागातील फुलेनगर या भागात बुधवारी सकाळी एका सलूनच्या दुकानात चव्हाण यास बळजबरीने घेऊन जात तेथे त्याचे मुंडण केल्याचे त्याने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पंचवटी पोलिसांनी या सर्व संशयितांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन बुधवारी (दि.३०) ताब्यात घेतले.
पंचवटीकरांचे प्रसंगावधान; पोलिसांची तत्परता
फुलेनगर भागातील रहिवाशांच्या जेव्हा काही तरी वेगळाच प्रकार घडत असल्याचे लक्षात आले तेव्हा या भागातील नागरिकांनी त्वरित पंचवटी पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत, अशोक साखरे, सहायक निरिक्षक सत्यवान पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ लवाजमा घेऊन फुलेनगर गाठले. यावेळी संशयितांच्या मोटारीला पोलिसांनी त्यांच्या वाहनांनी सर्वप्रथम ब्लॉक केले. सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेत अटक करत गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये दोघा महिलांचा समावेश असून ते एका राजकिय-सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.