घणसोलीत ई - टॉयलेटमध्ये स्फोट; एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 18:15 IST2018-11-02T18:14:51+5:302018-11-02T18:15:24+5:30
हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा स्थानिक पोलीस तपास करत आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

घणसोलीत ई - टॉयलेटमध्ये स्फोट; एकजण जखमी
नवी मुंबई - घणसोली येथील पालिकेच्या ई टॉयलेट मध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. या स्फोटात हर्ष शिंगटे (१८) हा गंभीर जखमी झाला असून त्याचा चेहरा व हात जळाले आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घणसोली सेक्टर ७ येथील मैदानातील ई टॉयलेट मध्ये हा प्रकार घडला. सिम्प्लेक्स परिसरात राहणार हर्ष शिंगटे (१८) हा सदर ई शौचालयात गेला होता. त्याचवेळी भीषण स्फोट होऊन शौचालयाचे तुकडे परिसरात दूरपर्यंत उडाले. तर स्फोटानंतर झालेल्या आगीमुळे हर्ष याचा चेहरा, दोन्ही हात व गळा ४० टक्केहून अधिक भाजला आहे. स्फोटाच्या आवाजाने जमलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ जवळच्या फ्रीशॉन रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नगरसेवक प्रशांत पाटील, सुरेश संकपाळ, कृष्णा पाटील, संदीप गलुगडे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विभाग अधिकारी दत्ताञय नांगरे व रबाळे पोलिसांना धारेवर धरत स्फोटाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. सदर मैदानात रात्रीच्या वेळी काही मुळे नशा करत बसलेली असतात. यामुळे स्फोटाच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचीही त्यांनी मागणी केली. त्यानुसार रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत.