कोर्टात स्फोट झाल्याने एकच खळबळ; स्पेशल सेल-NSG आणि फॉरेंसिक टीम पोहोचली अन् रिकामी केला परिसर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 03:12 PM2021-12-09T15:12:42+5:302021-12-09T18:34:56+5:30
Explosion in the rohini court : जखमींना जवळच्या आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी कोर्ट परिसर रिकामी केला असून कोर्टाचे दरवाजे बंद करून घेतले आहेत.
नवी दिल्ली - दिल्लीतील रोहिणी कोर्टात आज सकाळी कमी तीव्रतेचा स्फोट झाला. यानंतर कोर्टात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या स्फोटात २ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना जवळच्या आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी कोर्ट परिसर रिकामी केला असून कोर्टाचे दरवाजे बंद करून घेतले आहेत.
दिल्लीतील रोहिणी कोर्ट रूम नंबर १०२ मध्ये स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. तेव्हापासून कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांची केवळ सुनावणी थांबण्यात आली आणि दिल्ली पोलीस, फॉरेन्सिक टीम तपास करत आहे. त्याचवेळी, न्यायालय क्रमांक १०२ चे नायब न्यायालय (पोलीस) या घटनेत जखमी झाले असून त्यांना आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहिणी कोर्टात झालेला स्फोट हा कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट आहे. हा एक प्रकारचा क्रूड बॉम्ब आहे. त्याचवेळी घटनास्थळावरून आयईडी, स्फोटक आणि टिफिनसारखी वस्तू सापडली आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल तपास करत आहे. त्याचवेळी एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड)लाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
स्पेशल सेलला घटनास्थळावरून या वस्तू मिळाल्या
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या तपासात असे दिसून आले आहे की,रोहिणी कोर्टात कथित लॅपटॉप स्फोटाजवळ काही पांढर्या पावडरसारखी सामग्री विखुरली गेली होती आणि फाइलमध्ये कोणतीही कायदेशीर कागदपत्रे किंवा न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे नाहीत तर फक्त पांढरी पाने आहेत. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसह एनएसजी आणि फॉरेन्सिक टीमने तळ ठोकला आहे.
अग्निशमन विभागाला सकाळी 10:40 वाजता माहिती मिळाली
दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी कोर्टात सकाळी 10:40 वाजता स्फोट झाल्याचा कॉल आला. यानंतर अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. तर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घालून सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्यामुळे रोहिणी न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्याची सुनावणी थांबवण्यात आली आहे.