लाकडी ठोकळयात लपविलेली स्फोटके पोलिसांच्या श्वान ब्रुनोने दिली शोधून
By जितेंद्र कालेकर | Published: August 5, 2022 09:10 PM2022-08-05T21:10:04+5:302022-08-05T21:13:38+5:30
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम: गुन्हे शोधक श्वानांची ठाण्यात विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिके
जितेंद्र कालेकर, ठाणे | लोकमत न्यूज नेटवर्क: एखादी चोरी किंवा दरोडा पडल्यानंतर पोलिसांचे श्वानपथक दाखल झाल्यानंतर ते कशाप्रकारे गुन्हयांची उकल करण्यासाठी पोलिसांना मदत करतात, गुन्हेगारांचा मार्ग दाखविण्यासाठी उपयोगी ठरतात, याचे प्रात्यक्षिक ठाण्याच्या शिवाई मराठी विद्यालयात शुक्रवारी दाखविण्यात आली. यातीलच ब्रुनो या श्वानाने तर लाकडी ठोकळयातील स्फोटकेही अगदी सहज शोधून काढल्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळया वाजवून त्याचे काैतुक केले.
सध्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम १ ते १७ ऑगस्ट २०२२ या दरम्यान राबविण्यात येत आहेत. यानिमित्त आयकॉनिक आणि फ्लॅगशिपच्याही कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ ऑगस्ट रोजी शिवाई मराठी विद्यालयात ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शोधक श्वानांनी गुन्हे, स्फोटके आणि अमली पदार्थ कशाप्रकारे शोधली जातात, याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.
या कार्यक्रमास शिवाई मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप कट्टे तसेच इतर शिक्षक आणि शिक्षिका तसेच पाचवी ते दहावी पर्यंतचे सुमारे २०० विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना श्वानांची आणि ते करीत असलेल्या कामगिरीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका देशमुख यांनी दिली. त्यानंतर श्वान हाताळणारे (डॉग हॅन्डलर) मनोज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्वानांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी श्वान जॉली, ब्रुनो आणि बडी यांनी बॅगेतील, लाकडी ठोकळयातील आणि एका वाहनामध्ये लपविलेली स्फोटके शोधून काढली. तर श्वान सिंबा हिने अमली पदार्थ शोधली. सर्व श्वानांनी हॅन्डलरने दिलेल्या कमांडप्रमाणे वेगवेगळी प्रात्यक्षिके करुन दाखविली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी टाळयांच्या कडकडाटामध्ये या पोलीस श्वानांना उत्स्फूर्त शाबासकी दिली.