रोह्यातील बोगस जमीन खरेदी-विक्री व्यवहार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:37 PM2019-08-30T23:37:50+5:302019-08-30T23:37:55+5:30
एजंटचा सुुुळसुळाट : दुय्यम निबंधकांच्या सतर्कतेने प्रकार उजेडात
रोहा : रायगड जिल्ह्यातील चणेरा दिव गाव हद्दीतील शेकडो एकर जमीन घोटाळा प्रकरण समोर आहे. त्या प्रकरणातील सहभागी तत्कालीन अधिकारी यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार असतानाच बोगस जमीन खरेदी-विक्री व्यवहार अद्याप थांबतच नाहीत. याची प्रचिती गुरुवारी दुय्यम निबंधक कार्यालयात आली. जमीन मालकाचे बोगस ओळखपत्र तयार करून विक्री व्यवहार करणाऱ्या एजंटना दुय्यम निबंधक रोहा यांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात आले.
घोसाळे येथील गट नंबर ७१ च्या खरेदी-विक्री व्यवहारात रोह्याचे दुय्यम निबंधक ए.पी. बोरावके यांच्या सतर्कतेने विक्री करणाºया मालकाचे ओळखपत्र हे बोगस असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी बोगस मालक म्हणून उभ्या असलेल्या व्यक्तीने मला ४०० रुपये दिवसाच्या हजेरी रकमेवर येथे उभे केल्याचे कबूल केल्याने खळबळ उडाली. दिवसाच्या मजुरीवर बोगस व्यवहार एजंटमार्फत केले जात असल्याचे यावेळी समोर आले.या प्रकरणातील सर्व चार संशयितांना रोहा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दस्त नोंदणीसाठी आल्यानंतर आधारकार्ड व पॅनकार्ड यांची खातरजमा केली असता ते बोगस असल्याचे आढळून आले.
रोहा तालुक्यात जमिनीचे बोगस व्यवहार होत आहेत. यात सरकारी अधिकारी सामील असून वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मराठी माणसाला इस्रायली नागरिक म्हणून उभे करून व्यवहार करत आहेत, इतकी एजंटची मनमानी वाढल्याचे ग्राहक संरक्षण कक्षप्रमुख विजय बोरकर यांनी सांगितले. रजिशट्रेशन करताना प्रकरण उघडकीस आले आहे. मध्यस्थी वर्गाने त्रयस्थ व्यक्तीची जागा विकण्यासाठी चारशे रुपये मजुरी देऊन इस्राइलमध्ये जसा पेहराव असतो तसाच पेहराव करून दुय्यम निबंधकासमोर उभे केले.
दरम्यान, एकीकडे चणेरातील शेकडो एकर जमीन घोटाळा प्रकरण गाजत असतानाच जमिनींचे बोगस खरेदी-विक्री व्यवहार होतातच कसे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
मूळ मालकाऐवजी बोगस व्यक्ती उभी करून जमीन खरेदी-विक्रीचे प्रकार उघड झाले आहेत.