सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे पर्दाफाश; चोऱ्या करणाऱ्या सासू-सुनेसह पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 10:18 PM2021-10-01T22:18:56+5:302021-10-01T22:19:30+5:30
Crime News : तीन लाख १९ हजारांचा ऐवज जप्त
ठाणे : रात्रीच्या अंधारात घरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या अट्टल चार महिला चोरट्यांसह त्यांच्या एका साथीदाराला नौपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी शुक्रवारी दिली. या चोरट्यांमध्ये सासू-सुनेचा तसेच एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.
चरई भागातील पाण्याचे पाईप चोरीचा एक गुन्हा २१ सप्टेंबर राेजी नाैपाडा पाेलीस ठाण्यात दाखल झाला हाेता. त्याच चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना काही महिला चोरी करीत असल्याचे आढळले. चौकशीत त्या महिलांसोबत एक रिक्षा असल्याची माहिती पुढे आली. त्यादृष्टीने जवळपास आठ ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. ही रिक्षा कळवा नाका मार्गे नवी मुंबईच्या दिशेने गेल्याची बाब समोर आली. त्यानुसार दोन पथक तयार करून रिक्षाचा शोध घेण्यात आला. यामध्ये आकाश प्रेमजी कच्छी याला अटक केली. त्यानंतर सुमन कच्छी, शीतल कच्छी या सासू आणि सुनेसह रुक्मिणी कांबळे आणि नंदिनी गायकवाड यांना ३० सप्टेंबर रोजी अटक केली. हे सर्व जण कळवा येथील मुकुंद कंपनी येथील रहिवासी असून त्या चौघी भंगार विक्री करतात. तसेच त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून एका रिक्षासह २३ पाण्याच्या मोटारी असा दोन लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात १०० टेबल ड्रावर चॅनल, ॲल्युमिनिअम सेक्शनचे एक बंडल आणि एक ड्रिलिंग स्टँड असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस हवालदार महेश भोसले, साहेबराव पाटील, पोलीस नाईक संजय चव्हाण, सुनील राठोड, सचिन रांजणे, पोलीस शिपाई गोरखनाथ राठोड, जयेश येळवे आणि किशोर काळे या पथकाने केली.