सोशल मीडियावरून जाळ्यात ओढून फसवणाऱ्यांचा पर्दाफाश; व्हिडीओ कॉल घेऊ नका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 07:32 AM2021-07-30T07:32:16+5:302021-07-30T07:32:57+5:30
या मंडळींनी २५० हून अधिक जणांचे अश्लील व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना विकल्याची माहिती समोर आली
मुंबई : सोशल मीडियावरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. पुढे व्हॉट्सॲप क्रमांक शेअर होताच तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ कॉल आला. अश्लील संवाद रंगला आणि तरुणीच्या मधाळ बोलण्याच्या जाळ्यात अडकून तोही विवस्त्र झाला. पुढे याच व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात ५ जणांवर कारवाई करण्यात आली.
या मंडळींनी २५० हून अधिक जणांचे अश्लील व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना विकल्याची माहिती समोर आली. यात देशभरातील उच्चभ्रू तसेच उच्चशिक्षित मंडळी त्यांच्या जाळ्यात अडकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशी फसवणूक करणाऱ्या मंडळीच्या तक्रारी वाढत होत्या. त्यांनी फसवणुकीसाठी मुलींच्या नावे ट्वीटरची ५, इंस्टाग्रामची ४ व फेसबुकवर ३ असे एकूण १२ फेक अकाउंट उघडले होते.
आतापर्यंत या टोळीने राज्यभरात २५० जणांचे अश्लील व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना विक्री केले. विक्री करताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्यांनी टेलिग्रामचा वापर केला. या प्रकरणात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व ओडिशातील ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आरोपींकडून ६ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.
नेपाळ कनेक्शन
आरोपींनी सेक्सटॉर्शनद्वारे मिळणारी रक्कम स्वीकारण्यासाठी उघडलेल्या बँक अकाउंटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला. तसेच आर्थिक व्यवहारासाठी भारताव्यतिरिक्त नेपाळमधील बँक खात्याचाही वापर करण्यात आला आहे.
व्हिडीओ कॉल घेऊ नका
व्हाॅट्सॲपवर येणारे अनोळखी व्हिडीओ कॉल उचलू नका अथवा त्यावर कुठलाही प्रतिसाद देऊ नका असे आवाहन सायबर पोलिसांनी केले.