सूट बूट घालून हायप्रोफाईल भागात चोरी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश; २ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 02:59 PM2021-11-24T14:59:53+5:302021-11-24T15:00:19+5:30
या गँगने गेल्या १५-२० वर्षात अनेक फ्लॅट आणि दुकानात चोरी केली आहे. त्यांच्यावर १२ पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत.
नोएडा – दिल्ली, एनसीआर आणि मुंबईसह देशातील अनेक शहराच्या हायप्रोफाईल भागात चोरी करणाऱ्या गँगचा भांडाफोड नोएडा पोलिसांनी केला आहे. या गँगच्या २ सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २० लाख रुपयांसह मौल्यवान दागिने, ०९ एमएम कार्बाईनसह अनेक शस्त्र जप्त केली आहेत. या चोरांनी देशातील अनेक शहरात चोरी केली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
चोरी करण्यासाठी आरोपी सूट घालून पॉश सोसायटीच्या गार्ड्सला धोका देत इमारतीत प्रवेश करतात. त्यानंतर चोरी करून पसार होतात. पोलिसांच्या माहितीनुसार, गँग सिक्युरिटी गार्डसची फसवणूक करतात. MY Gate APP वर बनावट नाव आणि मोबाईल नंबर टाकून ते इमारतीच्या आतमध्ये प्रवेश करतात. त्यानंतर बंद असलेल्या घरांना लक्ष्य करतात. आरोपी शहनवाज आणि इमरान यांना पोलिसांनी अटक केली आहे. या गँगचे अनेक सदस्य सध्या जेलमध्ये आहेत. पोलिसांनी चोरीचं सामान खरेदी करणाऱ्या आणि शस्त्राचा पुरवठा करणाऱ्या अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांच्या तपासात समोर आलं की, या गँगने गेल्या १५-२० वर्षात अनेक फ्लॅट आणि दुकानात चोरी केली आहे. त्यांच्यावर १२ पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत. चोरी केलेले दागिने ते सिकंदराबाद येथील ज्वेलर कैलाश वर्मा यांच्याकडे विकत असल्याचं उघड झालं. पोलीस आरोपी सोनाराचा शोध घेत आहेत. आरोपी इमरान हा अलीकडेच चोरीच्या प्रकरणात ३ वर्ष जेलची शिक्षा भोगून बाहेर आला होता. परंतु जेलमधून आल्यानंतर तो पुन्हा चोरीच्या गुन्ह्याकडे वळाला. चोरीच्या घटनांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जवळपास ३५० सीसीटीव्ही आणि १५० संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. पोलिसांच्या पथकाने अनेकांची चौकशी केली. त्यानंतर खबरी आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेऊन अटक केली. शहरात चोरी करण्यासाठी या गँगचे सदस्य सूट बूट घालून पॉश एरियाची निवड करायचे. त्यानंतर कुणालाही संशय न येता ते सहजपणे समोरच्या सिक्युरिटी गार्ड्सची दिशाभूल करायचे. या गँगने आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आणि माल कुठे लपवला त्याचा पोलीस शोध घेत आहे.