अवैध बेटिंग ॲपचा पर्दाफाश; १२३ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 10:29 AM2024-03-01T10:29:56+5:302024-03-01T10:30:12+5:30
मुंबईसह देशात १० ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाचे छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना अवैधरीत्या बेटिंग व ऑनलाइन गेम्सची सुविधा देत असल्याचे सांगत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळत गंडा घालणाऱ्या मे. एनआययूएम कंपनीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत कंपनीची १२३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे; तसेच याप्रकरणी मुंबई, चेन्नई व कोची येथे १० ठिकाणी छापेमारी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या कंपनीने ऑनलाइन गेम व बेटिंगसाठी ॲप तयार केले होते. याचा देशभरात प्रसार केला. या ॲपच्या वॉलेटमध्ये पैसे भरून खेळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती; तसेच अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने सुरुवातीला घसघशीत बक्षिसेही दिली; मात्र हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये प्राप्त झाल्यानंतर कंपनीचे ॲप इंटरनेटवरून गायब झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी सर्वप्रथम केरळ व हरियाणा येथून पोलिसांत तक्रार दाखल झाली होती; मात्र या घोटाळ्याची व्याप्ती देशव्यापी असल्यामुळे व याप्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘ईडी’ने हा तपास सुरू केला आहे.
या घोटाळ्याद्वारे मिळालेले पैसे सिंगापूर येथे सुरू केलेल्या काही बनावट कंपन्यांकडे पाठविण्यात आले; तसेच भारतात देखील काही बनावट कंपन्यांची स्थापना करण्यात आली होती. सिंगापूर येथील कंपन्या सॉफ्टवेअर खरेदी करीत असल्याचे दाखवत त्या खरेदीपोटी हे पैसे पुन्हा भारतात पाठवत असल्याचे तपासात आढळून आले.