बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 10:32 PM2020-07-14T22:32:36+5:302020-07-14T22:34:49+5:30
गुन्हे गुप्तवार्ता विभागाची कारवाई, क़ुर्ल्यातून एकाला अटक
मुंबई : सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून सोशल मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा गुन्हे गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात कुर्ला येथून अविनाश दवड़े (२१) नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
त्याने आतापर्यंत इंस्टाग्राम, टिकटॉक, फेसबुकवर १७६ प्रोफाईलसाठी पाच लाखाहून अधिक बनावट फ़ॉलोअर्स तयार केले आहेत. बॉलीवूड पार्श्वगायिका भूमी त्रिवेदी यांचे इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाईल तयार करून, त्याद्वारे चित्रपटांमधील काही व्यक्तीकड़े काम मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी ११ जुलै पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधून याबाबत सांगितले. आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेला याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सीआययुचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांच्या पथकाने तपास सुरु केला.
याप्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कुर्ला येथून अभिषेकला अटक केली. त्याला १७ जुलै पर्यंत गुन्हे शाखेची कोठड़ी सुनाविण्यात आली आहे. शेख हा एका पीआर कंपनीत नोकरी करत होता, त्याच दरम्यान त्याला www.followerskart. com बाबत समजले. यातूनच समोर आलेल्या तपासात अभिषेक हा सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा एक भाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हे रॅकेट विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट प्रोफ़ाइल तयार करून, बनावट फॉलोअर्स, बनावट कमेंट तयार करण्याचे काम करतात. त्यातून त्यांच्यां सोशल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू होतो. अभिषेकने आतापर्यन्त इंस्टाग्राम टिक टॉक फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १७६ प्रोफाइलसाठी पाच लाखाहून अधिक बनावट फ़ॉलोअर्स तयार केले आहेत. हे बनावट फ़ॉलोअर्स विशिष्ट सोशल मिडीया प्रोफाइलचा फ़ॉलोअर्सची संख्या वाढवतात.
जेणेकरून सोशल मीडियावर प्रभाव पडेल. फ़ॉलोअर्समागे त्यांना पैसे मिळतात. याच झटपट पैशांच्यां मागे अभिषेकही अडकल्याचे समोर आले. त्याच्यासारखे अनेक तरुण यात गुंतल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे.
बॉट्ससॉफ्टवेअरचावापर
आतापर्यंतच्या तपासात असे बनावट फॉलोवर्स आरोपींकडून स्वतः किंवा विशिष्ट बेकायदेशीर सॉफ्टवेअर द्वारे तयार केले आहेत. अशा सॉफ्टवेअरला बॉट्स असे म्हणतात. सोशल नेटवर्कच्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेत हे फेरफार करून अशा बनावट प्रोफाईल पोस्ट करतात.
१००पेक्षाजास्तऑनलाइनपोर्टल
अंदाजे १०० पेक्षा जास्त सोशल मिडीया मार्केटिंग
पोर्टल या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. बनावट फ़ॉलोअर्स, खोट्या ओळखी किंवा बॉट्सद्वारे हे पोर्टल काम करतात. हे रॅकेट भारतीय तसेच परदेशी इंटरनेट नेटवर्क व सर्व्हरद्वारे कार्यरत आहे. असे ५४ भारतीय पोर्टल गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. भारतामध्ये प्रथमच अशा प्रकारचे सायबर गुन्हेगारी करणाऱ्या आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय विस्तार असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
असाही धोका...
बनावट प्रोफाईल आणि बनावट फॉलोअर्स उपयोग समाजात अफवा आणि दहशत निर्माण करण्यासाठी केला जात असल्याची माहितीही समोर आली आहे.