व्हेल माशाच्या उलटी तस्करीतील सूत्रधाराचा बनाव उघडकीस

By शीतल पाटील | Published: February 13, 2023 10:17 PM2023-02-13T22:17:00+5:302023-02-13T22:17:15+5:30

सिंधुदुर्गमधून अटक, आतापर्यंत २४ कोटींचा मुद्देमाल जप्त

Exposing mastermind in whale reverse smuggling, arrest from sindhudurg | व्हेल माशाच्या उलटी तस्करीतील सूत्रधाराचा बनाव उघडकीस

व्हेल माशाच्या उलटी तस्करीतील सूत्रधाराचा बनाव उघडकीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : व्हेल माशांच्या उलटी तस्करीतील मुख्य सूत्रधार नीलेश प्रकाश रेवणकर (४२, रा. तळाशील, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याचा बनाव उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. सांगलीत साथीदारांना अटक होताच रेवणकर याने अंबरग्रीस समुद्र किनारी बेवारस सापडल्याचा बनाव करून चलाखीने मालवण पोलिसांना खोटी माहिती देऊन किनाऱ्यावरून जप्त करण्यास लावल्याचे तपासात समोर आले आहे. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने सहा दिवस कोठडी सुनावली आहे.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करताना सांगलीत सलीम गुलाब पटेल (४९, रा. खणभाग), अकबर याकूब शेख (५१, रा. पिंगुळी, मुस्लीमवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्याची किंमत पावणेसहा कोटी होती. पटेल व शेख यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीत पोलिसांनी अकबर शेख याची कसून चौकशी केली. त्याने मुद्देमाल तळाशील (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील नीलेश रेवणकर याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे समोर आले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप माने, उपनिरीक्षक विशाल येळेकर, महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखालील पथक अकबरला सोबत घेत सिंधुदुर्गकडे रवाना झाले.

तळाशील येथे पर्यटक म्हणून पथकाने वेशांतर करुन माहिती घेतली. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार नीलेश प्रकाश रेवणकर यास शिताफीने पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच उर्वरित १८ किलो ६०० ग्रॅम वजनाचा व्हेल माशाची उलटी सदृश (अंबरग्रीस) मुद्देमाल समुद्रकिनारी टाकल्याचे सांगितले. सांगलीत साथीदारांना अटक होताच अंबरग्रीस समुद्रकिनारी बेवारस सापडल्याचा बनाव केला. त्याची माहिती मालवण पोलिसांना दिली. पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावरून मुद्देमाल जप्त केल्याची कबुली दिली.
संदीप शिंदे व पथकाने तत्काळ मालवण पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्यातील उर्वरित १८ किलो ६०० ग्रॅम वजनाचा अंदाजे १८ कोटी ६० किमतीचा व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थ (अंबरग्रीस) मुद्देमाल ताब्यात घेतला. मुद्देमालासह संशयित नीलेश याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोमवारी नीलेशला न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख करीत आहेत.

Web Title: Exposing mastermind in whale reverse smuggling, arrest from sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.