आयपीएलवर चालत्या कारमध्ये सुरु असलेल्या बेटिंगचा पर्दाफाश; पिंपरीत दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 07:57 PM2020-09-26T19:57:55+5:302020-09-26T19:58:49+5:30
चालत्या कारमध्ये ते दोघे आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावत असल्याचे समोर आले..
पिंपरी : देशभरात आयपीएलमुळे क्रिकेट फिवर आहे. याचा गैरफायदा घेत क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. चालत्या कारमध्ये ते दोघे आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावत असल्याचे समोर आले. पिंपरीगाव येथील वैभवननगर येथे शुक्रवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास छापा टाकून पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली.
लालचंद देवीदास शर्मा (वय ४९), चेतन जयरामदास कोटवाणी (वय ५०, दोघे रा. पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याकत आला असून त्यांच्याकडून २४ लाख २७ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
केला आहे.
पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार झीरो टॉलरन्स मोहिमेअंतर्गत अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी पिंपरी पोलीस ठाण्याकडून कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. वैभवनगर, येथे अवैधरित्या दोन व्यक्ती आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून चार मोबाइल, एक नोटबुक, दोन पेन, कॅलक्यूलेटर, एक चारचाकी वाहन व पाच हजार ८५० रुपयांची रोकड, असा २४ लाख २७ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्रनिकाळजे, उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.