सुजित पाटकरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; किशोर बिसुरे याचा जामिनासाठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 08:17 AM2023-11-02T08:17:23+5:302023-11-02T08:17:56+5:30
जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकरवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सुजित पाटकर व डॉ. किशोर बिसुरे यांच्या न्यायालयीन कोठडीत मुंबई सत्र न्यायालयाने १० नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. डॉ. किशोर बिसुरे यांनी जामिनासाठी अर्ज केला असून, न्यायालयाने त्यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
वरळी येथील एनएससीआय आणि दहिसर येथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सर्व्हिस कंपनीला मिळाले होते.
उत्तर देण्याचे ईडीला आदेश
कोविड सेंटरवर कार्यरत वैद्यकीय कर्मचारी ५० ते ६० टक्के असतानाही बनावट कागदपत्रे तयार करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आकडा वाढवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले.
लाइफलाइन कंपनीला कंत्राट मिळवून देण्यातही पाटकर यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच डॉ. बिसुरे या कोरोना केंद्रात प्रभारी म्हणून काम करत असे.
या दोघांना अटक करण्यात आली असून, ईडीने सुजित पाटकरविरोधात आरोपपत्र यापूर्वीच दाखल केले आहे. न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समोर बुधवारी किशोर बिसुरे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने ईडीला उत्तर देण्याचे आदेश दिले.