पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांची सर्रास विक्री, तरुण पिढी जाते आहारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 12:36 AM2019-11-29T00:36:28+5:302019-11-29T00:38:40+5:30
पालघरसह जिल्ह्यातील विद्यार्थी, तरुण अफीम, गांजा, दारू आदी व्यसनांच्या चक्र व्यूहात अडकत आहेत.
- हितेन नाईक
पालघर : पालघरसह जिल्ह्यातील विद्यार्थी, तरुण अफीम, गांजा, दारू आदी व्यसनांच्या चक्र व्यूहात अडकत आहेत. या देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईला यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाईचे धोरण अवलंबण्यासाठी ड्रग माफियांचा बिमोड करण्याकडे जास्त लक्ष पुरविण्याची इच्छा व्यक्त होत आहे.
पालघर जिल्ह्यातील पालघर, गांधी नगर, वेऊर, बोईसर, भैय्या पाडा, अनेक शहरात तसेच सागरी पोलीस स्टेशनअंतर्गत गावात, अफू, गांजा आणि इतर अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्र ी केली जात आहे. तर हुक्का पार्लरवर बंदी असली तरी सुगंधी तसेच हर्बल, सुगंधी चूर्ण आदी तंबाखूजन्य वस्तूंची राजरोस विक्री होत असल्याचे दिसते आहे. विडी-सिगारेट, पान टपऱ्यावर सहजपणे या वस्तू उपलब्ध होत असून संबंधित भागातील पोलिसांना याची माहिती असूनही त्यावर थातूरमातूर कारवाई होताना दिसते आहे. तर दुसरीकडे अफू, गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती देणाºया व्यक्तीचे नावच काही पोलिसांनी उघड केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. त्यामुळे अशा काही बेकायदेशीर गोष्टींची माहिती पोलिसांना कळविण्याऐवजी सामान्य माणूस गप्प राहणे पसंत करीत आहेत.
पालघरमधील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील अकरावीत शिकणारे काही तरुण - तरुणी एका निर्जन स्थळी सिगारेटस् ओढत असल्याची चित्रफीत सोशल मीडियावर फिरताना दिसते आहे. मार्च २०१९ मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये एकूण अकरा आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या दाखल गुन्ह्यामध्ये एकूण वीस लाख ८३ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
देशाचे भविष्य असलेल्या तरुणांना या अमली पदार्थांच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना पोलीस दलातील काहींची झडती घेत अंमली पदार्थांचा पुरवठा तसेच विक्री करणाºयावर कडक कारवाई करीत या टोळ्या उद्ध्वस्त करण्याची मोहीम आखावी लागणार आहे.
२०१८ मधील गुन्ह्यांची आकडेवारी; १३५ आरोपींना अटक
जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षात अवैध एनडीपीएस कायद्यांतर्गत ७९ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात १३५ आरोपी अटक करण्यात आले आहेत. या कारवाई अंतर्गत गांजा ४३ किलो ९७४ ग्रॅम १५ मिलिग्राम, कोकीन १० ग्रॅम, चरस ६० ग्रॅम, मॉफेड्रीन ३०४ ग्रॅम, हेरॉईन ८ ग्रॅम, ब्राऊन शुगर २४१ ग्रॅम ३७ मिली ग्रॅम व इतर ७५ बॉटल्स १३ लाख ३० हजार २५ टॅबलेट्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर दाखल गुन्ह्यांमध्ये एकूण ३१ लाख ४८ हजार ७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.