ई-नगेट गेमिंग ॲप घोटाळ्याची व्याप्ती 1000 कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 12:24 PM2022-11-27T12:24:57+5:302022-11-27T12:25:41+5:30
मुख्य आरोपी आमिर खानला ईडीची कोठडी; ७० कोटींची मालमत्ता जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ई-नगेट या मोबाइल गेमिंग ॲपने केलेल्या देशव्यापी आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती आता १ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याची माहिती ईडीच्या तपासातून पुढे आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी आमिर खान याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी कोलकाता येथील विशेष न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या सप्टेंबरपासून ईडीने आतापर्यंत मुख्य आरोपी आमिर खान आणि त्याच्या साथीदारांवर चार वेळा छापेमारी करत ७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, आमिर खान याने याव्यतिरिक्त देशभरात विविध ठिकाणच्या बँकात २०० खाती उघडली होती आणि त्याद्वारे एक हजार कोटी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती ईडीच्या नुकत्याच झालेल्या तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे या अनुषंगाने आता पुढील तपास सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये आमिर खान या कोलकाताचा निवासी असलेल्या व्यक्तीने ई-नगेट नावाची मोबाइल गेमिंग कंपनी स्थापन करत त्याद्वारे अनेक मोबाइल गेम्स ॲपच्या माध्यमातून सादर केले होते. या गेम्समध्ये लोकांना काही पैसे डिपॉझिट म्हणून ठेवण्यास सांगितले होते, तर त्यातील गेम्स खेळण्यासाठी अतिरिक्त पैशांची आकारणी करण्यात येत होती. जे लोक गेम जिंकतील, अशा लोकांना घसघशीत बक्षिसे देण्यात येत होती. तसेच, ज्यांना खेळायचे नसेल अशा लोकांना त्यांचे उर्वरित पैसे डिपॉझिटसह परत देण्यात येत होते. मात्र, सहा महिन्यांनंतर लोकांना त्यांचे पैसे परत मिळणे बंद झाले होते. तसेच हे ॲप देखील वर्षभराने लोकांचे पैसे घेऊन इंटरनेटवरून गायब झाले होते. यानंतर देशभरामध्ये कंपनीच्या विरोधात लोकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. सप्टेंबरमध्ये या प्रकरणाचा तपास ईडीने सुरू केला आणि यातील मुख्य आरोपी आमिर खान याला अटक केली.
क्रिप्टो करन्सीमध्ये १० कोटी
ईडीने आमिर खान याच्या घरावर सप्टेंबरमध्ये केलेल्या पहिल्याच छापेमारीदरम्यान त्याच्या घरातील पलंगातून
७ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती.
ईडीने या प्रकरणी जप्त केलेल्या एकूण ७० कोटी रुपयांपैकी सुमारे १० कोटी रुपयांची गुंतवणूक आमिर खान याने क्रिप्टो करन्सीमध्ये केल्याचे दिसून आले. ती करन्सीदेखील जप्त करण्यात आली आहे.