ठार मारण्याची धमकी देत एक लाखाची खंडणी उकळली; दोघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: November 16, 2022 06:49 PM2022-11-16T18:49:05+5:302022-11-16T18:49:16+5:30
शैक्षणिक संस्था चालकाला दिली धमकी: ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: शाळेत केलेल्या अनधिकृत बांधकामाची महापालिकेत तक्रार करण्यासह ठार मारण्यची देत भिवंडीतील शैक्षणिक संस्था चालकाकडून एक लाखांची खंडणी उकळणाºया दिलीप साठे उर्फ दिलीप पाटील (२९) आणि विकास कांबळे (२३) या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी बुधवारी दिली. त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
भिवंडीतील बॉम्बे केब्रींज स्कूलचे संचालक राकेश शेट्टी यांनी शाळेतील पाण्याच्या टाकी बांधकामाचे नूतनीकरण अलिकडेच केले होते. हे बांधकाम बेकायदेशीर असून त्याची महापालिकेत तक्रार करण्याची दिलीप पाटील याने शेटटी यांना धमकी दिली. त्याबाबत शेटटी यांनी त्यांचे सचिव प्रदीप पाटील यांना दिलीप याला भेटून त्याच्याशी त्याबाबत चर्चा करण्यास सांगितले. त्यानुसार प्रदीप हे दिलीपला भेटले. यावेळी, दिलीपने प्रदीप पाटील यांना ''तुम्ही केलेले बांधकाम अनाधिकृत असून जर तुम्हाला हे बांधकाम नियमित करायचे असेल तर तुम्ही मला दोन लाख रुपये द्या, नाहीतर मी महानगर पालिकेमार्फत तुम्हाला नोटीस काढेल, अशी धमकी देत नोटीस थांबविण्यासाठी प्रदीप यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली. दरम्यान ‘पोलीसांना माहिती दिली तर तुमच्या जिवाचे बरे वाईट होईल’ असेही धमकावले.
याबाबत पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांच्या माहितीनुसार प्रदीप यांनी दिलीप याच्याशी तडजोडीची चर्चा केली. त्यावेळी पालिकेला तक्रार न करण्यासाठी अखेर एक लाख रुपये देण्याचे ठरले. तेच पैसे ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये स्वीकारताना या दोघांनाही ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे, सहायक पोलीस निरीक्षक पोपट नाळे, उपनिरीक्षक विजय राठोड, उपनिरीक्षक महेश कवळे आणि जमादार सुभाष तावडे आदींच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अटक केली. पाटील हा भिवंडी कामतघर तर कांबळे हा शेलारगांवातील रहिवासी आहे. दोघेही मुळचे उस्मानाबाद येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. नाळे हे करीत आहेत.