खंडणी बहाद्दर आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 07:45 PM2024-01-09T19:45:22+5:302024-01-09T19:45:39+5:30
श्रीराम नगरच्या हर्षिता चाळीत राहणाऱ्या प्रमोद सिंह (४५) यांना आरोपी याकूब शेरू खानने खंडणी मागितली होती.
- मंगेश कराळे
नालासोपारा : बांधकाम व्यवसायिकाला फोन करून धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती मंगळवारी जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.
श्रीराम नगरच्या हर्षिता चाळीत राहणाऱ्या प्रमोद सिंह (४५) यांना आरोपी याकूब शेरू खानने खंडणी मागितली होती. ३१ डिसेंबरला संध्याकाळी सातच्या सुमारास प्रमोद यांना फोन करून याकूबने माझ्याजवळ बंदूक आहे, १२ वाजण्याच्या पहिले माझ्या खात्यावर १० हजार रुपये पाठव नाहीतर मी नालासोपाऱ्यात असून तुझ्या इथे येऊन गोळी घालेन असे बोलून अश्लील शिवीगाळ करत खंडणी मागितली होती. पेल्हार पोलिसांनी २ जानेवारीला खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने भविष्यात गंभीर प्रकार घडू नये या करीता वरिष्ठांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते.
वरील आदेशाचे पालन करुन पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी तात्काळ मध्यवती गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना बोलावून तपासकामी योग्य त्या सूचना दिल्या. तांत्रिक विश्लेषण व पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांचे गुप्त बातमीदाराचे बातमीवरुन आरोपी हा नाशिक जिल्ह्यातील मालेगांव येथे असल्याचे समजले. सदर ठिकाणी जावून आरोपीला तात्काळ ताब्यात घेणे कामी पोलीस हवालदार संग्राम गायकवाड, महेश बेल्हे व अनिल नांगरे यांना रवाना करण्यात आले. सदर पथकाने मालेगांव येथे जावून आरोपी राहत असलेल्या तास्कद परिसरात सापळा लावून आरोपी याकूब शेरु खानला दिनांक मंगळवारी ताब्यात घेवून गुन्हयाची उकल करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, पोलीस हवालदार संग्राम गायकवाड, महेश वेल्हे, अनिल नांगरे, हनुमंत सुर्यवंशी, शिवाजी पाटील, राजाराम काळे व सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी केली आहे.