पोलिस भरतीतील उमेदवारांकडून खंडणी, जिल्हा रुग्णालयातील लिपिकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 02:21 PM2023-05-17T14:21:45+5:302023-05-17T14:22:41+5:30

अपात्र ठरविण्याची धमकी देऊन १४ उमेदवारांकडून त्याने प्रत्येकी दीड हजार व एकीकडून ५००  वसूल केले आहेत. अलिबाग पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

Extortion from Police Recruitment Candidates, District Hospital Clerk Arrested | पोलिस भरतीतील उमेदवारांकडून खंडणी, जिल्हा रुग्णालयातील लिपिकाला अटक

पोलिस भरतीतील उमेदवारांकडून खंडणी, जिल्हा रुग्णालयातील लिपिकाला अटक

googlenewsNext


अलिबाग : रायगड पोलिस दलात भरती पात्र झालेल्या महिला उमेदवारांना फिटनेसचे  वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी  जिल्हा सरकारी रुग्णालयातील एका लिपिकाने धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. प्रदीप ढोबळ असे या लिपीकाचे नाव असून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात तो कार्यरत आहे. अपात्र ठरविण्याची धमकी देऊन १४ उमेदवारांकडून त्याने प्रत्येकी दीड हजार व एकीकडून ५००  वसूल केले आहेत. अलिबाग पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

याप्रकरणी शल्यचिकित्सक डॉ. सुहास मानेही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रायगड जिल्हा पोलिस दलातील भरती प्रक्रिया पूर्ण होऊन  २७२ पोलिस शिपाई आणि सहा चालक अशी एकूण २७८ उमेदवारांची पात्र यादी जाहीर झाली. यामध्ये ८१ महिला उमेदवार पात्र झाले आहेत. पात्र उमेदवारांची १० मेपासून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी प्रक्रिया सुरू झाली आहे.  खंडणीप्रकरणी पोलिस रुग्णालयातील वाॅर्डबॉयकडे विचारणा केली असता, त्याने लिपीक ढोबळ याने कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा डोस न घेणाऱ्या उमेदवारांना प्रत्येकी १५०० रुपये द्यावे लागतील,  अन्यथा अपात्र ठरवू, असे धमकावले असल्याचे सांगितले.  एका तरुणीने  तिसरी लस घेतली होती. तिला ५०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. अशाप्रकारे ढोबळ याला २१ हजार ५०० रुपये  देण्यात आले होते. कारवाईप्रसंगी अप्पर अधीक्षक अतुल झेंडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक दत्तात्रय जाधव करीत  आहेत. 

कागदपत्रांची तपासणी
गडचिरोली येथे पोलिस भरतीत बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात रायगड पोलिस दलातील एकाला अटकही झाली. पात्र उमेदवारांपैकी ३५ उमेदवार  प्रकल्पग्रस्त आहेत.  या उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल तपासणी  केली जात असून, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची  छाननी  केली जात असल्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले.

ढोबळ याला  बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून,   कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले, यामागील मुख्य सूत्रधार कोण, याची सविस्तर चौकशी केली जाईल. आवश्यकतेनुसार संबंधित वरिष्ठांकडेही चौकशी केली जाईल.
     - सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक
 

Web Title: Extortion from Police Recruitment Candidates, District Hospital Clerk Arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.