१२ लाखांची खंडणी; महिला वकील अटकेत; वाशी पाेलिसांकडून फरार आराेपीचा शाेध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 09:35 AM2024-05-31T09:35:49+5:302024-05-31T09:37:16+5:30
हॉटेल व्यावसायिक किशोर रत्नाकर शेट्टी आणि त्यांच्या भागीदारीत चालणाऱ्या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार संबंधित महिला वकिलाने केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: हॉटेल व्यावसायिकांकडून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि तडजोडीनंतर १२ लाख स्वीकारताना एका महिला वकिलास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. तिचा एक साथीदार फरार असून, वाशी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
हॉटेल व्यावसायिक किशोर रत्नाकर शेट्टी आणि त्यांच्या भागीदारीत चालणाऱ्या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार संबंधित महिला वकिलाने केली होती. यानंतर किशोर शेट्टी आणि संबंधित इतर व्यावसायिकांनी १३ मे रोजी वाशी सेक्टर ३० येथील तुंगा हॉटेलमध्ये तिची भेट घेतली. तुम्ही सर्व जण बेकायदेशीररीत्या हॉटेल चालवीत आहात, अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यावरील कारवाईसाठी मी यापूर्वीच महापालिका आणि मंत्रालयात तक्रार केली आहे. कारवाई टाळायची असेल, तर २० लाख रुपये द्यावे लागतील, असे तिने या व्यावसायिकांना सांगितले.
हॉटेलमध्ये घेतली भेट
शेट्टी व इतर व्यावसायिकांनी आरोपीच्या सांगण्यावरून पुन्हा २२ मे रोजी याच हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यावेळी खंडणीच्या रकमेत तडजोड करून ती १२ लाखांवर मान्य करण्यात आली.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार पोलिस सहआयुक्त संजय येनपुरे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक नीलम पवार यांच्या पथकाने सापळा रचला.
हॉटेलमध्ये खंडणीस्वरूपात १० हजारांचे खरे चलन आणि ११ लाख ९० हजार रुपयांचे बनावट चलन, अशी बारा लाखांची रक्कम स्वीकारताना तिला अटक झाली. या प्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.