सुपारी व्यावसायिकाकडे मागितली दहा लाखांची खंडणी; MIM शहराध्यक्षावर गुन्हा दाखल

By परिमल डोहणे | Published: October 10, 2023 11:34 PM2023-10-10T23:34:11+5:302023-10-10T23:34:20+5:30

राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Extortion of ten lakhs demanded from betel nut businessman; Case registered against MIM city president | सुपारी व्यावसायिकाकडे मागितली दहा लाखांची खंडणी; MIM शहराध्यक्षावर गुन्हा दाखल

सुपारी व्यावसायिकाकडे मागितली दहा लाखांची खंडणी; MIM शहराध्यक्षावर गुन्हा दाखल

परिमल डोहणे, चंद्रपूर: शहरातील सुपारी व्यावसायिकाला दहा लाखांच्या खंडणीसाठी तगादा लावून पैसे उकळणाऱ्या एआयएमआयएमच्या शहराध्यक्षावर शहर पोलिस ठाण्यात ३८४, ३८५,३२३, २९४, ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. अजहर शेख असे त्या खंडणीबहाद्दर शहराध्यक्षाचे नाव आहे.

वसीम झिमरी हे चंद्रपुरातील ठोक सुपारी विक्रेते आहेत. चंद्रपूरसह लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना सुपारी पुरविण्याचा व्यवसाय करतात. ऑक्टोबर २०२२ मध्ये एआयएमआयएम शहराध्यक्ष अजहर शेख याने वसीम झिमरी यांच्या एका कर्मचाऱ्याचे पानमटेरियलचे वाहन अडविले. पोलिस ठाण्यात सुगंधित तंबाखूची तस्करी करीत असल्याची तक्रारीची भीती दाखवून तीन लाखांची खंडणी मागितली. यावेळी तडजोड करून अडीच लाख रुपये त्याला दिले. त्यानंतर परत २८ ऑगस्ट २०२३ रोजी अजहरने बाबूपेठ परिसरात सुपारी वाहतुकीची गाडी अडवून पैशाची मागणी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी फोनवरून माहिती दिल्यानंतर बाबूपेठ येथे गेल्यानंतर अजहरने शिवीगाळ केली. १० लाख रुपयांची मागणी केली. परतु त्याला पैसे दिले नाही. यावेळीसुद्धा त्याने पोलिस तक्रारीची भीती दाखविली. दरम्यान, यावेळी बाचाबाची होऊन अजहरने मारहाण केल्याचे वसीमने तक्रारीत म्हटले आहे. वारंवार तो खंडणीसाठी त्रास देत असल्याने वसीम अख्तर झिमरी याने शहर पोलिस ठाणे गाठून अजहर शेखविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून अजहर शेखविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वसीमवरही गुन्हा दाखल

अझहर शेख यांनी ही वसीम झिमरीविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार केली आहे. त्या तक्रारीच्या आधारावर वसीम झिमरी व अन्य दोघांवर शहर पोलिस ठाण्यात कलम ३२३, ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

Web Title: Extortion of ten lakhs demanded from betel nut businessman; Case registered against MIM city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.