ऑनलाईन कर्ज घेणाऱ्यांची पिळवणूक; अनेकांच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 05:58 AM2021-01-04T05:58:44+5:302021-01-04T05:58:54+5:30

Online instent loan: झटपट कर्ज देणारे ॲप्लिकेशन्स डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलमधील सर्व डाटा हॅक होत असल्याने मोबाईलधारकाची सर्व माहिती समोरील व्यक्तीकडे जाते. या माध्यमातून ब्लॅकमेलिंग व इतर आर्थिक फसवणुकीचेही प्रकार घडले आहेत.

Extortion of online borrowers | ऑनलाईन कर्ज घेणाऱ्यांची पिळवणूक; अनेकांच्या तक्रारी

ऑनलाईन कर्ज घेणाऱ्यांची पिळवणूक; अनेकांच्या तक्रारी

Next

- अरुण वाघमोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: ‘झटपट ऑनलाईन कर्ज मिळाले पण डोक्याला मोठा ताप झालाय’ असा पश्चाताप करण्याची वेळ सध्या अनेकांवर आली आहे. कर्ज वसुलीसाठी कर्जदारालाच नव्हे तर त्याच्या नातेवाईकांनाही रात्रंदिवस फोन अन् मेसेज करून या ऑनलाईन सावकारांनी बेजार केले आहे. विशेष म्हणजे हे वसुली पंटर शिवीगाळ करत धमक्याही देत असल्याने अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.


अवघ्या पाच मिनिटात मिळेल कर्ज अशी जाहिरातबाजी केली जात आहे. केवळ आधारकार्ड क्रमांक देऊन पाच ते सात हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. कर्ज घेण्यासाठी ॲप्लिकेशन डाऊनलोड करताना मोबाईलमधील सर्व डाटा ॲप्लिकेशनचालकांकडे जातो. कर्जपरतफेडीची मुदत अवघी पाच ते दहा दिवसाची असते आणि त्याला व्याज २५ ते ४० टक्क्यांपर्यंत असते. 


मुदतीत पैसे दिले नाही तर कर्जदारासह त्याच्या मोबाईलमधील संपर्क यादीतील लोकांना रात्री-अपरात्री फोन केले जातात. मेसेज पाठविले जातात. अशा फोन कॉल्समुळे बहुतांश जण गोंधळून जातात.

असे ॲप्लिकेशन्स घातक
n झटपट कर्ज देणारे ॲप्लिकेशन्स डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलमधील सर्व डाटा हॅक होत असल्याने मोबाईलधारकाची सर्व माहिती समोरील व्यक्तीकडे जाते. या माध्यमातून ब्लॅकमेलिंग व इतर आर्थिक फसवणुकीचेही प्रकार घडले आहेत.

ऑनलाईन घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात भरमसाट रकमेची मागणी करून कर्जदाराला धमक्या देण्याचे प्रकार घडत आहेत. कर्जदार स्वत: कर्ज घेत असल्याने हा प्रकार सायबर ॲक्टमध्ये येत नाही, मात्र नागरिकांनी अशा आमिषाला बळी पडू नये. यामध्ये मोबाईल डाटा हॅक होत असल्याने आणखी फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.
- प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक 
सायबर पोलीस स्टेशन

Web Title: Extortion of online borrowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.