विशेष सुरक्षा दलाचा अजब कारभार; अतिरिक्त मनुष्यबळ असलेल्या एसआरपीतूनच ‘बॉडीगार्ड’ची प्रतिनियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 07:35 PM2020-01-20T19:35:07+5:302020-01-20T19:45:38+5:30
अन्य घटकातील पात्र इच्छुकांवर अन्याय
मुंबई : विशेष सुरक्षा दलात (एसपीयू)मध्ये प्रतिनियुक्तीसाठी निश्चित केलेल्या मनुष्यबळाहून अधिकजण कार्यरत असतानाही पुन्हा तेथीलच जवानांना पाचारण करण्याचा अजब प्रकार घडला आहे. राज्य राखीव दलाच्या (एसआरपी) नवी मुंबई ( गट क्रमांक ११) येथील आठ जवानांना पुन्हा प्रतिनियुक्तीसाठी निवड करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे एसआरपीच्या अप्पर महासंचालकांनी सूचना करुनही एसपीयूच्या अधीक्षक रुपाली अंबुरे यांनी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षी पुण्यात झालेल्या मैदानी परीक्षेच्या निकालाचा मुदत पुढच्या महिन्यात संपत असल्याने त्यांनी घेतलेली मेहनत व्यर्थ जाणार आहे. त्यामुळे पात्र असलेल्या अन्य पात्र इच्छुकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अति महत्वाच्या व्यक्ती, सत्ताधारी, राजकारणांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ‘एसपीयु’कडून अंगरक्षक (बॉडीगार्ड) पुरविले जातात. त्यांना असलेला धोका आणि त्याचे महत्वपाहून त्यासाठी बॉडीगार्डची निश्चिती केली जात असून विविध पोलीस घटकातील अंमलदार, अधिकाऱ्यांची पाच वर्षासाठी प्रतिनियुक्ती केली जाते. संबंधितांना नियमित वेतनाहून ३० टक्के अधिक अधिक भत्ता दिला जातो, त्याशिवाय २४ तास ड्युटीनंतर २४ तासाची ‘ऑफ’ मिळतो. त्यामुळे त्याठिकाणी प्रतिनियुक्तीसाठी अनेकजण इच्छुक असतात. एसपीयूकडून बऱ्याच वर्षानंतर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्यांची ऑक्टोबर २०१८ मध्ये पुण्यात एसआरपीच्या मैदानावर शारीरिक क्षमतेची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्याबाबतचा निकाल जाहीर करण्यास विलंब लावण्यात आला. ‘लोकमत’नेही ही बाब चव्हाट्यावर आणल्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये निकाल जाहीर करण्यात आला. त्यावेळी विशेष शाखेतील ५ वर्षाहून अधिक कालावधीत पुर्ण झालेल्या काहीजणांना परत पाठविण्यात आले होते. त्यानंतर अधीक्षक रुपाली अंबुरे यांनी १० जानेवारीला एसआरपीच्या विविध गटातील २९ जणांना प्रतिनियुक्तीसाठी निवड केली आहे. त्यामध्ये नवी मुंबईच्या पथकातील ८ जणांचा समावेश आहे. वास्तविक एसपीयूसाठी या पथकातील १११ मंजूर पदे असताना १३०जण कार्यरत आहेत. तरीही आणखी आठजणांना पाचारण केले आहे. त्याउलट अन्य पथकातील मंजूर पदापेक्षा कमी भरती केली असताना त्यांची निवड करण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एसआरपीच्या प्रमुख अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांनी त्याबाबत एसपीयूला वारंवार पत्रव्यवहार करुन सूचना केली होती. मात्र तरीही विशेष सुरक्षा शाखेच्या प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे अन्य इच्छुक पात्र जवानावर अन्याय झालेला आहे.