फेसबुक फ्रेंडने घातला ज्येष्ठ महिलेला ७ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 04:55 PM2018-10-28T16:55:16+5:302018-10-28T16:57:36+5:30

कोंढवा परिसरात राहणाऱ्या ७२ वर्षीय महिलेला फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी केलेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे.

Facebook friend made fraud of 7 lakh rupees | फेसबुक फ्रेंडने घातला ज्येष्ठ महिलेला ७ लाखांना गंडा

फेसबुक फ्रेंडने घातला ज्येष्ठ महिलेला ७ लाखांना गंडा

googlenewsNext

पुणे : कोंढवा परिसरात राहणाऱ्या ७२ वर्षीय महिलेला फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी केलेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. अनोळखी व्यक्तीने परदेशातून महागडे रोलॅक्स घड्याळ पाठविल्याचे सांगून ६ लाख ८१ हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        संबंधित महिलेच्या तक्रारीवरून आठ व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या गृहिणी असून त्यांचे पती सैन्यात नोकरीला होते. त्यांचे फेसबुकवर अकाउंट आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांना फेसबुकवर आकाश अहिरवार याने रिक्वेस्ट पाठवली. ती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंग सुरू झाले. त्यानंतर आरोपीने त्याचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर फिर्यादी यांना पाठवला. त्यामुळे त्यांचे व्हॉट्सअ‍ॅपवरही चॅटींग आणि व्हिडीओ कॉलद्वारे बोलण होत. व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग सुरू झाल्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली. त्यावेळी आकाशने आपण  इटलीत सिव्हील इंजिनियर असल्याचे सांगितले. 

       त्यानंतर काही दिवसांनी चॅटिंग दरम्यान आकाशन तक्रारदारांना ८ आॅक्टोंबर रोजी महागडे रोलॅक्स घड्याळ घेतल्याचे सांगितले. घड्याळाचे फोटो देखील त्यांना तक्रारदारांना पाठवले. गिफ्ट पाठवण्यासाठी त्याने तक्रारदारांना पत्ता घेवून त्यावर ते पाठविल्याचे सांगितले. दोन दिवसांनी त्यांना दिल्ली येथील फोन आला. त्यांच्या इटली येथून भेट आली असून, त्यासाठी कस्टम ड्युटी म्हणून ३५ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी नमूद खात्यावर रक्कम भरली. त्यानंतर तक्रारदांना पुन्हा फोन आला व तुम्हाला आलेल्या पार्सलमध्ये ४० हजार युरो निघाले असून त्याचा दंड म्हणून १ लाख १३ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदार यांनी पुन्हा रक्कम भरली.

            दोनदा रक्कम भरल्यानंतर पुन्हा अनेक फोन आले व वेगवेगळी कारणे सांगून त्यांना ६ लाख ८१ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. तक्ररादार यांच्याकडून वेळोवेळी रुपये घेऊनही अद्याप त्यांना भेटवस्तू ताब्यात मिळाली नाही म्हणून त्यांनी हा प्रकार त्यांनी नातेवाइकांच्या कानावर घातला असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून आठ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार करीत आहेत.

Web Title: Facebook friend made fraud of 7 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.