फेसबुकच्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 08:54 PM2020-08-17T20:54:42+5:302020-08-17T20:55:06+5:30
अंखी दास यांनी रविवारी तक्रार दाखल केली आहे.
फेसबुक इंडियाच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अंखी दास यांनी दिल्ली पोलिसांत धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. अंखी दास यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात येत होती, त्यामुळे त्यांनी सोमवारी तक्रार दाखल केली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांच्या तक्रारीनुसार सायबर सेल युनिट काम करत आहे.
अंखी दास यांनी रविवारी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी असा आरोप केला आहे की, काही लोक ऑनलाइन पोस्ट करून जीवे मारण्याची धमकी देत आहेत आणि त्यांच्याबद्दल अश्लील कमेंट करीत आहेत. तक्रारीनुसार, 14 ऑगस्ट रोजी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखासंदर्भात ही धमकी देण्यात आली आहे. लेख प्रसिद्ध झाल्यापासून आपल्याला धमक्या मिळत असल्याचे अंखी दास यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
याचबरोबर, तक्रारीत अंखी दास यांनी म्हटले आहे की, ऑनलाईन कंटेंटद्वारे आपल्यासह कुटुंबीयांचा जिवाला धोका आहे. तसेच, कंटेंटमध्ये एका वृत्तपत्रातील लेखाच्या आधारे आपली प्रतिष्ठा कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा सुद्धा अंखी दास यांनी केला आहे. याशिवाय, आरोपीकडून राजकीय संबंधामुळे जाणीवपूर्वक आपला अपमान केला आणि आता ऑनलाईन आणि ऑफलाईन धमकी देण्यात आली आहे. हे आपली प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप अंखी दास यांनी केला आहे.
दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रात फेसबुकवर प्रसिद्ध झालेल्या लेखावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.