फेक न्यूज पसरवण्यात व्हॉट्सअॅपला मागे टाकत फेसबुकची आघाडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 01:19 AM2020-07-23T01:19:04+5:302020-07-23T06:44:00+5:30
राज्यात ५५२ गुन्ह्यांची नोंद
मनीषा म्हात्रे
मुंबई : कोरोनाबाबत अफवांचे पीक वाढू लागले असून, त्याला धार्मिक रंग चढवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न जोर धरत आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यभरात तब्बल ५५२ गुन्हे नोंद झाले आहेत. यात बीडची आघाडी आहे. राज्याच्या सायबर विभागाने केलेल्या अभ्यासावरून सर्वाधिक अफवा व्हॉट्सअॅपवरून पसरल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. सद्यस्थितीत व्हॉट्सअॅपला मागे टाकत फेसबुकवरून अफवांचा जोर वाढत असल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या आकडेवारीतून पाहावयास मिळते आहे. त्यानुसार सायबर विभाग फेसबुकवरील हालचालींवर विशेष लक्ष ठेवून आहे.
या गुन्ह्यांचा अभ्यास करता त्यातील फेसबुकवर टाकलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून २३४ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याखालोखाल व्हॉट्सअॅपसंबंधित २०८ प्रकरणे आहेत. तर यात टिष्ट्वटर १८, इन्स्टाग्राम ४ तर टिकटॉक २८ गुन्ह्यांचा समावेश आहे़ विविध कारवायांत २८८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
२३२ आरोपींची ओळख पटली असून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. आतापर्यंत १४६ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर १२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पोलीसपत्रकही व्हायरल...
याच काळात शासन आदेशाबरोबरच पोलीस पत्रकात फेरफार करत ते पत्रक व्हायरल करण्यात आले. त्यामुळेही गोंधळ निर्माण झाला होता.
सेलिब्रिटींना कोरोना झाल्याची जोरदार चर्चा
सेलिब्रिटी, राजकीय मंडळींसह नामांकित व्यक्तींना कोरोना झाल्याच्या अफवांनी जोर धरला.
११८ आक्षेपार्ह पोस्ट डिलीट
सायबर पोलिसांकड़ून करण्यात आलेल्या विविध कारवायांत तब्बल ११८ आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत.