"आयुष्यातून जात आहे, माफ करा"; क्रेडिट कार्डच्या बिलांना कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 12:07 PM2020-12-13T12:07:46+5:302020-12-13T12:08:40+5:30
Crime News: बदनामी आणि रिकव्हरी एजंटांच्या धमकीचे फोन कॉल्समुळे त्रस्त झाल्याने रणजीत यांनी उडी मारण्यापूर्वी पत्नीला मेसेज पाठविला होता. हा मेसेज डीएसपींपर्यंत पोहोचला आणि मुंबई पोलिसांनी सुत्रे हलविली.
क्रेडिट कार्डचे बिल भरू न शकल्याने आणि रिकव्हरी एजंटांच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून मुंबईतील एका व्यक्तीने आत्महत्येचे पाऊल उचलले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो वाचला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३२ वर्षीय रणजीत पाटील (बदललेले नाव) हे मुलुंडमध्ये राहतात. त्यांची पत्नी नर्स आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली होती. यामुळे क्रेडिट कार्डचे ८०००० रुपयांचे बिल देणे जमले नाही. दुसरीकडे क्रेडिट कार्ड कंपनीचे कर्मचारी, रिकव्हरी एजंट सतत बिल भरण्यासाठी रणजीतवर दबाव टाकत होते. एजंटांच्या धमक्यांपासून सुटका करून घेण्यासाठी रणजीत यांनी मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला.
बदनामी आणि रिकव्हरी एजंटांच्या धमकीचे फोन कॉल्समुळे त्रस्त झाल्याने रणजीत यांनी शनिवारी तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उडी मारण्यापूर्वी पत्नीला मेसेज पाठविला होता. यामध्ये ''आयुष्यातून जात आहे, माफ करा", असे लिहिले होते. घाईगडबडीत हा मेसेज रणजीत यांच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट केला. हा मेसेज एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पाहिला. हा मेसेज त्यांनी एका समाजसेवी संस्थेला पाठविला तिथून तो झेन ७ चे डीसीपी प्रशांत कदम यांना फॉरवर्ड झाला. डीसीपी यांनी तातडीने सूत्रे हलवत केवळ ७ ते ८ मिनिटांत रणजीत यांच्या मोबाईल नंबरवरून त्यांच्या लोकेशनचा पत्ता शोधला.
लगेचच आजुबाजुला असलेल्या पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस रणजीत यांच्याजवळ पोहोचले आणि त्यांना या टोकाच्या निर्णयापासून वाचविले. रणजीत यांनी मुलुंड रेल्वे स्थानकावर ट्रेनखाली जीव देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा ते असफल ठरले होते. लोकांनी त्याना पाहिले आणि त्यांना वाचविले. यानंतर रणजीत यांनी पुन्हा आत्महत्येचा विचार केला.