एआयद्वारे तयार होताहेत बनावट आधार, पॅनकार्ड; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 09:06 IST2025-04-24T09:05:53+5:302025-04-24T09:06:35+5:30
वैयक्तिक स्तरावर यामुळे ओळख चोरी होऊन सायबर गुन्हेगार बँक खात्यामधून अनधिकृत व्यवहार करू शकतात आणि आर्थिक फसवणूक करू शकतात.

एआयद्वारे तयार होताहेत बनावट आधार, पॅनकार्ड; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा
मुंबई : आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) साधनांचा वापर करत बनावट आधार, पॅनकार्ड तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. सायबर विभागाने याबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याचा वापर आर्थिक फसवणुकीसह देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यापर्यंत केला जाऊ शकतो, अशी शक्यताही आहे. त्यामुळे असे बनावट आधार, पॅनकार्डबाबत माहिती मिळताच तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहनही विभागाने केले आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी बनावट शासकीय ओळखपत्रे तयार करण्याचे प्रकार वाढत आहेत. काही वापरकर्त्यांनी तर ‘साम ऑल्टमन’ आणि ‘एलोन मस्क’ यांसारख्या उच्च पदस्थ व्यक्तींच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून हे सिद्धही केले आहे. अशा कृती पुढे गंभीर स्वरूप घेऊ शकतात. वैयक्तिक स्तरावर यामुळे ओळख चोरी होऊन सायबर गुन्हेगार बँक खात्यामधून अनधिकृत व्यवहार करू शकतात आणि आर्थिक फसवणूक करू शकतात.
बनावट ओळखपत्र कसे ओळखायचे?
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बनावट आधार किंवा पॅन कार्डमध्ये न जुळणारे फॉन्ट आढळतात. हिंदी, इंग्रजी मजकुराच्या लेखन रचना भिन्न आढळते. ओळखपत्रातील व्यक्तीचे छायाचित्र कृत्रिम भासते. खऱ्या ओळखपत्रात क्यूआर कोड असतो. बनावट ओळखपत्रांवर तो आढळत नाही. शुद्धलेखनाच्या चुकांवरून ओळखपत्र बनावट आहे हे ओळखता येऊ शकते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अशा प्रकारचे ओळखपत्र आढळल्यास सायबर विभागाच्या हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
गैरवापराची भीती
बनावट ओळखपत्राचा वापर बँका, टेलिकॉम कंपन्या आणि सरकारी योजना फसवण्यासाठी होऊ शकतो. यामुळे बोगस कर्जे, अवैध खाते
निर्मिती आणि सार्वजनिक निधीचा अपहार होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने, अशा नकली दस्तऐवजांचा गैरवापर कायद्याची अंमलबजावणी टाळण्यासाठी, सायबर गुन्हे घडवण्यासाठी आणि संभाव्य गैरकृत्यांसाठी होऊ शकतो.