१७ लाखाचे बनावट अॅपल आयफोन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 09:23 PM2019-12-01T21:23:56+5:302019-12-01T21:24:18+5:30
गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
मुंबई : अॅपल, आयफोन आदी कंपनीच्या बनावट मोबाईल विक्री करणाºया दुकानावर पोलिसांनी छापा टाकून १७ लाख ३० हजार रुपये किंमतीचे १७३ मोबाईल जप्त केले. अल्ली मोहम्मद इब्राहिम मेनन (वय ५५) या दुकान चालकाला अटक केले असून त्याच्या पायधुनी परिसरातील कर्नाक बंदर रोडवरील आश्रफी शॉपिंग सेंटरवर गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-३ च्या पथकाने ही कारवाई केली.
कर्नाक बंदर रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये आयफोन १४५, सॅमसंग-२०,एमआय-०५, विवो-०२ आदी कंपनीचे बनावट मोबाईल विक्री करण्यात येत आहेत, अशी माहिती कक्ष-३चे प्रभारी निरीक्षक अशोक खोत ,निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यांनी त्याबाबत मोबाईल कंपनीच्या कॉपी राईटचे अधिकार असलेल्या ग्रिफीन इन्टेलेक्चअल प्रॉपर्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट कंपनीशी संपर्क साधून मोबाईल किंग येथील आश्रफी शॉपिंग सेंटरवर छापा टाकला. त्याठिकाणी विविध कंपनीचे तब्बल १७३ बनावट मोबाईल आढळून आले. त्याची एकुण किंमत १७ लाख ३० हजार रुपयाचे आहे.
दुकानचालक मेनन याला ३ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण शाखेचे उपायुक्त (प्रकटीकरण) शहाजी उमाप यांनी सांगितले.