'फोन पे लोन' देण्याच्या नावावर सुरू होती फसवणूक; पोलिसांनी केला बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 02:17 PM2021-12-25T14:17:35+5:302021-12-25T14:17:58+5:30
Crime News : पोलिसांनी आरोपींकडून केले ९ मोबाइल जप्त; टोळीत महिलेचाही समावेश.
दिल्लीपोलिसांनी लोन देण्याच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ९ मोबाइल्सशिवाय एक वायरलेस सेटही जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक महिलेचाही समावेश असून अरुण कुमार, सुनील, हिमांशू महेश्वरी आणि अंजली तोमर अशी आरोपींची नावे आहेत.
२२ डिसेंबर रोजी शाहनवाज नावाच्या एका व्यक्तीनं साऊथ इस्ट जिल्ह्याच्या सायबर ठाण्यात तक्रार दिली होती. त्याला लोनची आवश्यकता असल्यानं दोन ठिकाणी त्यानं चौकशीही केली होती. यादरम्यान त्याला फोन आला आणि लोनची आवश्यकता आहे का अशी विचारणा करण्यात आली. यानंतर रजिस्ट्रेशन फी आणि लोन प्रोसेसिंग फीच्या नावावर ८५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन वसूल करण्यात आली.
यानंतरही त्या व्यक्तीला लोन मिळालं नाही. त्यानंतर त्या व्यक्तीनं सातत्यानं फोन करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सातत्यानं फोन येत असल्यानं आरोपीनी फोन उचलणं बंद केलं. सायबर ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली. ज्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते, त्यांची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. तपासानंतर पोलिसांना एक पत्ता सापडला. पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकल्यानंतर तिथे बनावट कॉलसेंटर असल्याचं दिसून आलं. या प्रकरणी अधिक चौकशीनंतर त्या टोळीत एका महिलेचाही समावेश असल्याचं समोर आलं.
वेबसाईटद्वारे माहिती
चौकशीदरम्यान आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एका वेबसाईटद्वारे ते ज्यांना लोनची आवश्यकता आहे अशा लोकांची माहिती गोळा करत होते. तसंच त्या लोकांना थेट फोन करुन लोन देण्याचं आमिष दाखवलं जायचं. तसंच लोनच्या नावावर जितकं शक्य असेल तितकी रक्कमही घेतली जात होती. आतापर्यंत या आरोपींनी किती रुपयांची फसवणूक केली आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत.