तोतया सीबीआय अधिकाऱ्याचा पर्दाफाश; गुन्हे शाखेने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 09:00 PM2019-03-13T21:00:38+5:302019-03-13T21:02:36+5:30
जयेश जगदीश शेट्टी असे आरोपीचे नाव असून त्याच्या फरार साथीदारांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई - सीबीआय (केंद्रीय गुप्तचर यंत्रणा) अधिकारी असल्याचे भासवून बनावट सोने ज्वेलर्सला देऊन फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याच्या गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. जयेश जगदीश शेट्टी असे आरोपीचे नाव असून त्याच्या फरार साथीदारांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जयेश वसई परिसरात राहतो. तो आणि त्याचे फरार साथीदार हे ज्वेलर्सच्या दुकानात जातात. या ठिकाणी मालकाचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर काही जण ज्वेलर्सच्या दुकानात येतात. सीबीआय अधिकाऱ्याने फोन केला असल्याचे भासवून सोने गहाण ठेवण्याच्या नावाखाली बनावट सोने देत होते. अशा प्रकारे अंधेरी येथील एका ज्वेलर्सची त्यांनी १ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केली होती.
ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी नुकताच अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष १० चे अधिकारी करीत होते. पोलीस निरीक्षक अरविंद घाग, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर मुदिराज, वाहिद पठाण, एएसआय धोंडीराम सावंत, पोलीस हवालदार गावंडे यांनी सुरू तपास सुरु केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी जयेशला वसईतून ताब्यात घेत त्याला अटक केली. तर याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.