'स्पेशल 26' चित्रपट पाहून बनवला प्लॅन; फेक CBI अधिकारी बनून आले अन् 40 लाख लुटले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 10:08 PM2023-05-10T22:08:49+5:302023-05-10T22:21:23+5:30
बनावट अधिकारी असल्याचे सांगून सोन्याच्या दुकानात शिरले. 40 लाखांसह 500 ग्राम सोनेही लुटले.
नवी दिल्ली: बॉलिवूड चित्रपट स्पेशल-26 च्या धर्तीवर दरोडा टाकणाऱ्या एका टोळीला दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन ज्वेलर्सकडून 40 लाख रुपये आणि 500 ग्रॅम सोने लुटले होते. आरोपींनी सांगितले की, ते स्पेशल-26 चित्रपटाने प्रभावित झाले होते. आरोपींकडून 11 लाख रुपये आणि 104 ग्रॅम सोने, दोन डीव्हीआर आणि पाच फोन जप्त करण्यात आले आहेत.
क्राइम ब्रँचचे स्पेशल सीपी रवींद्र यादव यांनी सांगितले की, फरश बाजार येथील रहिवासी हरप्रीत सिंगने सांगितले की, 17 एप्रिल रोजी एका महिलेसह सहा जण त्यांच्या दुकानात आले होते. स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून त्यांनी दुकानात दागिन्यांची तपासणी सुरू केली. दरम्यान, एका व्यक्तीने आपापसात समझोता करण्याच्या नावाखाली एक कोटी रुपयांची मागणी केली. कारवाईच्या भीतीने पीडित घाबरली.
त्यामुळे आरोपींना 40 लाख रुपये आणि 500 ग्रॅम सोने देण्यात आले. आरोपींनी दुकानातून सीसीटीव्हीचा डीव्हीआरही नेला. हरप्रीतला संशय आल्याने तिने दिल्ली पोलिसांना माहिती दिली. यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला हरप्रीतच्या दुकानाभोवती लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची झडती घेण्यात आली आणि आरोपींची ओळख पटवून त्यांना पकडण्यात आले. घटनेच्या दिवशी आरोपींनी गळ्यात सीबीआयचे बनावट ओळखपत्रही लटकवले होते आणि त्यांच्या हातात वॉकीटॉकी होती. आरोपींमध्ये संदीप भटनागर, पवन गुप्ता, योगेश कुमार आणि हिमांशू उर्फ दिनेश यांचा समावेश आहे.